मत्तय 13:1-9
मत्तय 13:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला; आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.”
मत्तय 13:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच दिवशी येशू घरातून बाहेर पडले आणि सरोवराच्या किनार्यावर बसले. तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती इतकी मोठी गर्दी केली, म्हणून ते एका होडीत बसून किनार्यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागले. अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले; ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली. परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले. ज्याला ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”
मत्तय 13:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्रकिनार्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला. आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.”
मत्तय 13:1-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या काठावर जाऊन बसला. लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ इतकी गर्दी करू लागल्या की, तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक काठावर उभे राहिले. त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला. तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले. काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले. काही सुपीक जमिनीत पडले. त्याला शंभरपट, साठपट, तर तीसपट असे पीक आले. ज्याला ऐकण्यासाठी कान असतील त्याने ऐकावे!”