लूक 8:4-18
लूक 8:4-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला, “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता. आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे? मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये. तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे. आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत. पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात. आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता यांविषयी जपा, कारण ज्याच्याजवळ आहे त्यास दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्यास वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
लूक 8:4-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितला: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली. काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.” हे सांगून ते म्हणाले, “ज्याला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “या दाखल्याचा अर्थ काय आहे?” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की, “ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये, ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’ “या दाखल्याचा अर्थ असा आहे: बी हे परमेश्वराचे वचन आहे. पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही. खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात. काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत; काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात. “कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही. यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, जे त्यांच्याजवळ आहे असे त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”
लूक 8:4-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला, “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले; ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून शंभरपट पीक आले.” असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की, ‘त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.’ हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्वफळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही; तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा; ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
लूक 8:4-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व नगरोनगरीचे लोक त्याच्याजवळ आले असता येशू दाखला देऊन म्हणाला, “पेरणारा बी पेरायला निघाला. तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले व आकाशातील पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले. ओलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले. काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. काटेरी झुडुपांच्या वाढीमुळे त्यांची वाढ खुंटली. काही चांगल्या जमिनीत पडले. ते उगवून शंभरपट पीक आले.” त्यांना हे सांगून झाल्यावर त्याने आवाहन केले, “ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे.” त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे. परंतु इतरांबरोबर मी दाखले देऊन बोललो ते अशासाठी की, ते पहात असता त्यांना दिसू नये व ऐकत असता त्यांना समजू नये. हा दाखला असा आहे:बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात परंतु सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो आणि त्यांना विश्वास ठेवण्यापासून व तारणप्राप्ती करून घेण्यापासून वंचित करतो. खडकाळ जमिनीवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात व आनंदाने वचन ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात पण कसोटीच्या वेळी बहकून जातात. काटेरी झुडुपांमध्ये पडलेले बी म्हणजे जे ऐकतात पण संसाराच्या चिंता, धनदौलत व ऐहिक सुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व त्यांच्या जीवनात परिपक्व फळ दिसत नाही. चांगल्या मातीत पडलेले बी म्हणजे जे वचन ऐकून ते सालस व शुद्ध अंतःकरणात धरून ठेवतात आणि फळ देईपर्यंत धीर धरतात. दिवा लावून तो कोणी भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व प्रकट होणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, तरीही त्याला वाटते की, त्याच्याजवळ आहे, तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”