लूक 5:1-11
लूक 5:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.” शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
लूक 5:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते. त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले. येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.” शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.” तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या. जे सहकारी दुसर्या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या. शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!” कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते; आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते. येशू शिमोनाला म्हणाले, “भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.” त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.
लूक 5:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनार्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनार्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते; तसेच शिमोनाचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नकोस; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” मग मचवे किनार्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
लूक 5:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता. त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो मचवा किनाऱ्यापासून थोडासा लोटावा,असे त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास प्रबोधन करू लागला. आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली. दुसऱ्या मचव्यात असलेल्या साथीदारांनी येऊन आपणांस साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. ते आल्यावर दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की, ते बुडू लागले. परंतु हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून लांब जा, मी एक पापी मनुष्य आहे.” त्यांनी धरलेल्या माशांचा थवा पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण आश्चर्यचकित झाले होते. तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेसुद्धा आश्चर्यचकित झाले होते. येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, सर्व काही सोडून देऊन, ते त्याचे अनुयायी झाले.