लूक 21:10-15
लूक 21:10-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा, कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
लूक 21:10-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्यांनी म्हटले: “राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. “तरी हे सर्व घडण्यापूर्वी, ते तुम्हाला पकडून तुमचा छळ करतील. माझ्या नावामुळे तुम्हाला सभागृहामध्ये नेतील व तुरुंगात टाकतील आणि तुम्हाला राज्यपाल आणि राजे यांच्यापुढे आणण्यात येईल. यामुळे तुम्हाला त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. तेव्हा स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. कारण मी तुम्हाला योग्य शब्द आणि सुज्ञपणाचे विचार सुचवेन की ज्यास तुमचे शत्रू तुम्हाला अडविण्यास किंवा त्याचे खंडन करण्यास असमर्थ ठरतील.
लूक 21:10-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने त्यांना म्हटले, “‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हांला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा; कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.
लूक 21:10-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो पुढे म्हणाला, “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल. मोठमोठे भूकंप होतील. जागोजागी साथी येतील व दुष्काळ पडतील. भयंकर उत्पात व आकाशात महान चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. तुमचा छळ करतील. तुम्हांला चौकशीसाठी सभास्थानांच्या स्वाधीन करतील. तुरुंगात डांबतील. माझ्या नावाकरिता राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे हजर करतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. त्या वेळी उत्तर कसे द्यावे, ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की, तिला रोखण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.