लूक 18:35-43
लूक 18:35-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे. लोकांनी त्यास सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्यास म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.” ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.
लूक 18:35-43 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू यरीहो शहराजवळ आले, तेव्हा एक आंधळा भिकारी, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. जवळून जात असलेल्या गर्दीचा आवाज त्याने ऐकला, तेव्हा त्याने विचारले काय चालले आहे. त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू रस्त्याने जात आहेत.” तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” “प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले. यावर येशू म्हणाले, “ठीक आहे, तुला दृष्टी दिली आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि परमेश्वराची स्तुती करीत तो येशूंच्या मागे चालू लागला. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती केली.
लूक 18:35-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की, एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “येशू नासरेथकर जवळून जात आहे.” तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
लूक 18:35-43 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय चालले आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी मिळावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी मिळाली आणि तो देवाचा महिमा वर्णन करीत त्याच्यामागे चालू लागला. हे पाहून सर्व लोकांनी देवाचे स्तवन केले.