लूक 13:10-17
लूक 13:10-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.” नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली. नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.” येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.
लूक 13:10-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते, तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली. येशूंनी शब्बाथ दिवशी बरे केले हे पाहून सभागृहाचा प्रमुख खूपच संतप्त झाला व लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत; त्या दिवसातच आजारातून बरे होण्यासाठी येत जा; शब्बाथ दिवशी नाही.” प्रभूने त्यांना उत्तर दिले, “ढोंग्यांनो! तुमच्यातील कोणी शब्बाथ दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला गोठ्यातून बाहेर पाणी पाजण्यास नेत नाहीत काय? ही स्त्री अब्राहामाच्या वंशातील कन्या आहे, तिला सैतानाने अठरा वर्षे कैद करून बंधनात जखडून ठेवले होते, शब्बाथ दिवशी तिला बंधमुक्त करणे योग्य नाही का?” येशूंचे हे उद्गार ऐकून त्याचे सर्व विरोधक लज्जित झाले, पण लोक मात्र ते करीत असलेल्या अद्भुत कृत्यांमुळे हर्षभरित झाले.
लूक 13:10-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यांत काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत; तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.” परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?” तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
लूक 13:10-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू साबाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली. येशूने साबाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “जेव्हा काम केले पाहिजे, असे सहा दिवस आहेत, तर त्या दिवसांत येऊन बरे व्हा. साबाथ दिवशी येऊ नका.” परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव साबाथ दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहामाची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. साबाथ दिवशी हिला या बंधनातून सोडविणे योग्य नव्हते काय?” तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधक फजीत झाले आणि जी आश्चर्यकारक कृत्ये त्याच्याकडून होत होती, त्या सर्वांमुळे लोकसमुदायाला आनंद झाला.