YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 11:37-54

लूक 11:37-54 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परूश्याने त्यास आपल्या घरी येऊन स्वतः बरोबर जेवायला बोलावले. तो आत गेला आणि आपल्या जागी जेवायला बसला. परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परूश्याला फार आश्चर्य वाटले. तेव्हा प्रभू त्यास म्हणाला, “तुम्ही परूशी प्याला व ताट बाहेरुन साफ करता पण तुम्ही आतून लोभीपणाने व दुष्टतेने भरलेले आहात. अहो बुद्धीहीन मनुष्यांनो! ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का? पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या आणि नंतर सर्वकाही तुमच्यासाठी शुद्ध होईल. परंतु तुम्हा परूश्यांना हाय असो कारण तुम्ही पुदिना, जीरे व प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नितीने जगावे व देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हास सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरासारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.” एक नियमशास्त्राचा शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.” तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांस वाहण्यास कठीण असे ओझे त्यांच्यावर लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही. तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या संदेष्ट्यासाठी तुम्ही कबरा बांधता. असे करून तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’ तर, संदेष्ट्याचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल. होय, मी तुम्हास खरोखर सांगतो की हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे भवन व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल. तुम्हा नियमशास्त्र शिक्षकांची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.” येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याचा फार विरोध करू लागले व त्यास अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारु लागले. तो जे बोलेल त्या शब्दांमध्ये त्यास पकडण्यासाठी ते टपून होते.

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:37-54 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंनी आपले बोलणे संपविले, त्यावेळी एका परूश्याने त्यांना भोजनास यावे अशी विनंती केली; त्याप्रमाणे ते गेले व मेजाभोवती बसले. परंतु जेव्हा त्याने पाहिले की येशूंनी जेवणासाठी प्रथम हात धुतले नाहीत तेव्हा त्या परूश्याला आश्चर्य वाटले. ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात. अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय? तुमच्या अंतर्भागाबद्धल बोलायचे तर गरिबांना उदारता दाखवा म्हणजे तुम्हाला सर्वकाही शुद्ध असल्याचे आढळेल. “तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत. “अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे. “तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.” त्यावेळी तिथे असलेला एक नियमशास्त्रज्ञ म्हणाला, “गुरुजी, तुम्ही आता जे बोलला, त्यामुळे तुम्ही आमचा सुद्धा अपमान करीत आहात.” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही जे नियमशास्त्रतज्ञ आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांच्या खांद्यावर अशी अवघड ओझी लादता, जी ते वाहू शकत नाहीत, परंतु त्यांना मदत करण्यासाठी स्वतःचे एकही बोट लावण्याची तुमची इच्छा नसते. “तुम्हाला धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता ज्यांना तुमच्या पूर्वजांनी मारून टाकले. म्हणून तुमच्या पूर्वजांनी जे काही केले ते योग्यच होते अशी तुम्ही साक्ष देत आहात; त्यांनी संदेष्ट्यांचा वध केला आणि तुम्ही त्यांच्या कबरा बांधता. याकारणास्तव परमेश्वर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे म्हणतात, ‘मी तुमच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवेन आणि त्यांच्यापैकी काहींचा तुम्ही वध कराल आणि इतरांचा छळ कराल.’ म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल. हाबेलाच्या रक्तापासून तर जखर्‍याहच्या रक्तापर्यंत जो मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये वधला गेला होता. त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल हे मी तुम्हाला सांगतो. “तुम्हा नियमशास्त्र तज्ञांना धिक्कार असो, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली. तुम्ही स्वतः प्रवेश करत नाही व जे प्रवेश करू पाहतात त्यांनाही अडखळण करता.” येशू बाहेर गेल्यानंतर, परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांना उग्रपणाने विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांना शब्दात धरण्याची ते संधी शोधू लागले.

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:37-54 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो बोलत आहे इतक्यात एका परूश्याने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली; मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परूश्याला आश्‍चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे. परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्‍या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.” तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.” तो म्हणाला, “तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहण्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन, आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जिवे मारतील व कित्येकांना छळतील; ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त, म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखर्‍याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.” तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परूशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले; आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरून दोषी ठरवावे म्हणून ते टपून राहिले.

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:37-54 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूचे प्रबोधन संपल्यावर एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली. तो भोजनाला बसला असता त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत, असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता मात्र तुमचे अंतर्याम हावरेपणा व दुष्टपणा ह्यांनी बरबटलेले असते. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बाह्यांग निर्माण केले त्याने अंतरंगही केले नाही काय? म्हणून जे तुमच्याजवळ आहे, त्याचा दानधर्म करा आणि पाहा, तुमच्याकरिता सर्वकाही शुद्ध होईल. परंतु तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे पुदिना, कढीपत्ता व प्रत्येक प्रकारची वनस्पती ह्यांचा तुम्ही दशांश देता आणि न्याय व देवाची प्रीती यांच्याकडे मात्र कानाडोळा करता. न्याय व देवप्रीती ह्या गोष्टी आचरणात आणणे आवश्यक होते. तुम्हां परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! सभास्थानांमध्ये मानाची आसने मिळवणे व बाजारात नमस्कार घेणे, हे तुम्हांला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार! ओळखू न येणाऱ्या थडग्यांसारखे तुम्ही आहात. त्यांच्यावरून माणसे नकळत चालत फिरत असतात.” शास्त्र्यांपैकी एकाने त्याला म्हटले, “गुरुवर्य, तुम्ही असे बोलून आमचाही अपमान करता.” तो म्हणाला, “तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी ठार मारले! अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार ठरता व तुमच्या पूर्वजांच्या कृत्यांना मान्यता देता; तुमच्या पूर्वजांनी तर संदेष्ट्यांना ठार मारले व तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता. ह्यावरून देवाच्या शहाणपणाने स्पष्ट केले आहे, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यांतील कित्येकांना ते ठार मारतील व कित्येकांना छळतील.’ ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून सर्व संदेष्ट्यांचे रक्‍त, म्हणजे हाबेलच्या रक्‍तापासून वेदी व मंदिर ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात करण्यात आला, त्याच्या रक्‍तापर्यंत जे रक्‍त सांडले गेले; त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जाईल. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जाईल. तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ज्ञानाची किल्‍ली घेऊन गेलात, परंतु तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते, त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.” येशू तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी त्याच्यावर दबाव आणीत पुष्कळ गोष्टींविषयी त्याला चिथवू लागले. म्हणजेच त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात पकडावे म्हणून ते प्रयत्नशील होते.

सामायिक करा
लूक 11 वाचा