YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 11:14-23

लूक 11:14-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते, भूत बाहेर आल्यावर, तो बोलू लागला व लोकांचा जमाव आश्चर्यचकित झाला. परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की, भूतांचा अधिपती जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भूते काढतो. आणि काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. पण त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता म्हणून तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरातील लोक एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात. आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हास हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता ‘मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो’ पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या साहाय्याने भूते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भूते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे. जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्यास मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो. जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:14-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू एका मुक्या दुरात्म्याला काढत होते, तो दुरात्मा निघून गेल्यानंतर, त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित झाले. पण काहीजण म्हणाले, “हा बालजबूल, भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने भुतांना घालवित असतो.” दुसर्‍यांनी परीक्षा पाहण्याकरिता आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी केली. त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते. जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, आता मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? मग तेच तुमचे न्यायाधीश असतील. परंतु मी जर परमेश्वराच्या शक्तीने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. “जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो. “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:14-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एकदा तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की, भूत निघाल्यावर मुका बोलू लागला; त्यावरून लोकसमुदायास आश्‍चर्य वाटले. पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो”; आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि घरावर घर पडते. सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता. पण मी जर बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने1 भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते; परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो.

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:14-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एकदा येशू एक भूत काढत होता व ते मुके होते. भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले. पण त्यांतील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बालजबूल ह्याच्या साहाय्याने हा भुते काढतो.” दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गातले चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले कोणतेही राष्ट्र फार काळ टिकत नाही आणि कुटुंब आपसात भांडू लागले, तर तेही दुभंगते. मग सैतानाच्या राज्यात फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता. पण मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर हे सिद्ध होते की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य त्याच्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य येऊन त्याच्यावर ह्रा करतो व विजय मिळवतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती, ती तो घेतो आणि लूट म्हणून वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे. जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो.

सामायिक करा
लूक 11 वाचा