YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 5:1-13

लेवीय 5:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल; किंवा कोणी अशुद्ध वस्तुला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तुला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल. किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी; आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे. त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय. मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल. “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग सपिठ पापार्पण म्हणून आणावे; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय. त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय. अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.”

सामायिक करा
लेवीय 5 वाचा

लेवीय 5:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जर पाहिलेल्या किंवा माहीत झालेल्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी सार्वजनिकरित्या केलेला आरोप जे ऐकतात पण काही बोलत नाहीत, तर ते पाप करतात, त्यांना जबाबदार धरले जाईल. एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे. कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास; किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल. जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे, आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे. परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी. त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये. नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. “जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये. त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय. अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.”

सामायिक करा
लेवीय 5 वाचा

लेवीय 5:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्ध वनपशूच्या शवाला, अशुद्ध ग्रामपशूच्या शवाला अथवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या शवाला नकळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहोत असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा; मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो. बरीवाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली; आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टीसंबंधाने तो दोषी समजावा; मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी, आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे; त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी; आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे. त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वराजवळ आणावीत; त्यांपैकी एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकाकडे आणावीत, मग याजकाने ह्यांतील पापार्पण पहिल्याने अर्पावे; त्याची मुंडी त्याने मुरगळून मोडावी पण ती अलग करू नये; पापार्पणाचे थोडे रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे; हे पापार्पण होय. दुसर्‍या पक्ष्याचा त्याने विधिपूर्वक होम करावा; त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. दोन होले अथवा पारव्याची दोन पिलेदेखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे; त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय. त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातले मूठभर घेऊन स्मारकभाग म्हणून वेदीवरील हव्यांवर परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करावा; हे पापार्पण होय. ह्या कोणत्याही गोष्टीसंबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा.”

सामायिक करा
लेवीय 5 वाचा