लेवीय 26:14-21
लेवीय 26:14-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत; तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला. जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल. या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन. मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन. तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत. तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
लेवीय 26:14-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि या सर्व आज्ञा पाळल्या नाही, आणि माझे विधी तुम्ही स्वीकारले नाही आणि माझे नियम तुच्छ लेखून माझ्या आज्ञा पाळण्यात कसूर केली आणि माझ्या कराराचा भंग केला, तर मी तुमच्यासोबत हे करेन: तुम्हाला एकाएकी भयंकर भीतीने ग्रासून टाकेन, तुम्हाला क्षयरोग होईल व असे भयंकर ज्वर तुम्हाला पछाडतील की त्यामुळे तुमचे नेत्र अंधुक होतील आणि तुमची शक्ती कोमेजून जाईल. तुम्ही केलेली धान्याची पेरणी व्यर्थ जाईल, कारण तुमचे पीक तुमचे शत्रू खाऊन टाकतील. मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल. “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन. मी तुमच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी कास्यासारखी करून टाकेन. तुमची मेहनत व्यर्थ गोष्टींमुळे नाश पावेल, कारण तुमची जमीन पिके देणार नाही व तुझ्या देशातील झाडांना फळे येणार नाहीत. “ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन.
लेवीय 26:14-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु तुम्ही जर माझे ऐकले नाही, ह्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील. मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल. इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन, तुमच्या बळाचा गर्व मी मोडून टाकीन. तुम्हांला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन; तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत. तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.