विलापगीत 3:25-57
विलापगीत 3:25-57 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे. पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे. ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे. त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल. एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे; कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही. जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील. कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही. पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे, परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय? परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का? इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय? कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी? चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू. आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावूया. आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस. तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस. कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस. लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस. आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे. भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे. माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत. माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही; परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही. माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात. निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे. गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे. माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.” परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला. तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको. मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”
विलापगीत 3:25-57 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे. मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे. कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे. त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल. जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे. कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत. जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे. ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत व त्यांना दुखवित नाहीत. जगातील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवून चिरडणे, परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे, कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय? प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय? आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी? आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू. आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू: आम्ही पाप केले आणि बंड केले आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही. “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला. तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये. तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे. “सर्व शत्रूंनी आपले मुख आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे. आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.” माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत. माझे डोळे अखंडपणे, न थांबता, अश्रुपात करीत राहतील, याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील. माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे. जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे. त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला; पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, आणि मला वाटले की आता माझा नाश होणार. याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला, तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.” मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”
विलापगीत 3:25-57 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणार्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे. त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे. त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल. मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा. कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही; तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही. पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायांखाली तुडवणे, परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडवणे, कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय? प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय? आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी? चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ. आपण आपले हात वर स्वर्गांतील देवाकडे करून आपली अंत:करणे त्याच्याकडे उन्नत करू. “आम्ही अपराध केला व फितुरी केली; त्याची तू क्षमा केली नाहीस. तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस. तू आपणा स्वत:स अभ्राने आच्छादलेस, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही. तू आम्हांला राष्ट्रांमध्ये हेंदर व केरकचरा केले आहेस. आमच्या सर्व शत्रूंनी आमच्यावर आपले तोंड वासले आहे. भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हांला प्राप्त झाली आहेत. माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळत आहेत. माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत; परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत. माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जिवास दुःख देत आहेत. निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे. गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे, माझ्यावर दगड लोटला आहे. माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले; मी म्हणालो, ‘माझा अंत होत आहे.’ हे परमेश्वरा, अतिशय खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला. तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस. मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.