यहोशवा 7:1-13
यहोशवा 7:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला. बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले, नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, “फक्त दोन तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत.” म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले. यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले. मग यहोशवा म्हणाला, हायहाय! “हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांस यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते! हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?” तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास? इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्यामध्ये राहणार नाही. तर उठ, लोकांस पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्यांचा नाश करा. त्या तुमच्यातून काढून त्यांचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.”
यहोशवा 7:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु इस्राएली लोक समर्पित केलेल्या वस्तूंबाबतीत अविश्वासू होते; यहूदाह गोत्रातील जेरहाचा पुत्र जब्दी याचा पुत्र कर्मी, याचा पुत्र आखानाने त्यातील काही वस्तू घेतल्यामुळे याहवेहचा क्रोध इस्राएल राष्ट्राविरुद्ध भडकला. यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले. जेव्हा ते यहोशुआकडे परत आले, त्यांनी सांगितले, “संपूर्ण सैन्याला आय विरुद्ध लढाई करण्यासाठी जावे लागणार नाही. ते जिंकण्यासाठी दोन ते तीन हजार माणसे पाठवा आणि संपूर्ण सैन्याला थकवू नका, कारण फक्त थोडेच लोक तिथे राहतात.” तेव्हा सुमारे तीन हजार हल्ला करून गेले; परंतु आयच्या लोकांनी त्यांचा पराभव केला. आयच्या लोकांनी त्यांच्यातील छत्तीसजणांना मारून टाकले. त्यांनी इस्राएली सैनिकांचा वेशीपुढे शबारीमपर्यंत पाठलाग केला; यामुळे लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून पाण्यासारखी झाली. तेव्हा यहोशुआने त्याची वस्त्रे फाडली आणि तो संध्याकाळपर्यंत याहवेहच्या कोशासमोर जमिनीवर तसाच पालथा पडून राहिला. इस्राएलच्या वडीलजनांनी तसेच केले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर राख शिंपडली. आणि यहोशुआ म्हणाला, “हाय, सार्वभौम याहवेह, तुम्ही आम्हाला अमोर्यांच्या हातून ठार करणार होता, तर आम्हाला यार्देन नदी पार करून का आणले? आम्ही यार्देन पलीकडे आमच्याजवळ होते त्यातच आम्ही समाधानी होतो! हे प्रभू तुमच्या सेवकाला क्षमा करा. आता इस्राएलचा त्यांच्या शत्रूकडून पराभव झालेला आहे तर मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि आसपासची राष्ट्रे याबद्दल ऐकतील, तेव्हा ते आम्हाला सभोवार घेरतील, आमच्यावर हल्ला करतील आणि आम्हाला नामशेष करून टाकतील. मग तुमच्या महान नावाच्या थोरवीचे काय होईल?” याहवेह यहोशुआस म्हणाले, “ऊठ! तू असा पालथा का पडला आहेस? इस्राएलने पाप केले आहे; त्यांनी माझा करार भंग केला आहे, ज्याचे पालन करण्यास मी त्यांना सांगितले होते. समर्पित केलेल्या वस्तू ते घेऊन आले आहेत; त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी त्या वस्तू स्वतःच्या मालकीच्या केल्या आहेत. यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही. “तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, तुमच्यापैकी प्रत्येकाने उद्यासाठी स्वतःला शुद्ध करून घ्या, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: अहो इस्राएली लोकहो, तुमच्यामध्ये समर्पित केलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू काढून टाकेपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूपुढे उभे राहू शकणार नाही.
यहोशवा 7:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, “सर्व लोकांनी तेथे जायला नको, फक्त दोन-तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत.” म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले. तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशवा म्हणाला, “हायहाय! हे प्रभू परमेश्वरा, आम्हांला अमोर्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देनेपार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देनेपलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते! हे प्रभो, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली; आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?” तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ऊठ, असा पालथा का पडलास? इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. म्हणून इस्राएल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही; ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग : उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.’