यहोशवा 6:1-27
यहोशवा 6:1-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत, नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.” नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.” तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.” यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.” या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला. सात याजक एडक्याच्या शिंगांचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे; हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल, तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल. पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिले, कर्ण्यांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले. त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.” तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई-वडीलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते. त्या वेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, “जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.” याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.
यहोशवा 6:1-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे. सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा. मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील. जेव्हा त्यांच्या रणशिंगाचा मोठा व दीर्घ आवाज तुम्ही ऐकाल, त्यावेळी संपूर्ण सैन्याने मोठा जयघोष करावा. तेव्हा शहराचा तट कोसळेल आणि सैन्य पुढे जाईल, नंतर प्रत्येकजण सरळ आत प्रवेश करेल.” तेव्हा नूनाचा पुत्र यहोशुआने याजकांना बोलाविले आणि त्यांना सांगितले, “याहवेहच्या कराराचा कोश घ्या आणि त्यासमोर सात याजक रणशिंगे घेऊन जातील.” त्याने सैनिकांना हुकूम दिला, “पुढे चला! सशस्त्र सुरक्षा सैनिकांना याहवेहच्या कोशापुढे ठेऊन शहराच्या सर्व बाजूने प्रदक्षिणा घाला.” जेव्हा यहोशुआने लोकांबरोबर बोलणे केले, तेव्हा सात याजक याहवेहच्या पुढे त्यांची सात रणशिंगे वाजवित पुढे निघाले आणि याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्यामागे गेला. सशस्त्र शिपाई रणशिंगे वाजविणार्या याजकांच्या पुढे चालू लागले आणि मागून येणारे शिपाई कोशाच्या मागे चालत राहिले. या सर्व वेळेपर्यंत रणशिंगे वाजविली जात होती. परंतु यहोशुआने सैन्याला आज्ञा दिली होती, “युद्धाची घोषणा करू नका, तुम्ही मोठ्याने जयघोष करू नका, तुमचा आवाज उंचावू नका, जयघोष करा असे मी तुम्हाला सांगेन त्या दिवसापर्यंत एकही शब्द बोलू नका.” तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. दुसर्या दिवशी सकाळीच यहोशुआ उठला आणि याजकांनी याहवेहचा कोश उचलून घेतला. सात याजक सात रणशिंगे फुंकत याहवेहच्या कोशाच्या पुढे निघाले. सशस्त्र सैनिक त्यांच्या पुढे गेले आणि रणशिंगे फुंकली जात असताना मागे जाणारे सुरक्षा सैनिक याहवेहच्या कोशाच्या मागे गेले. तेव्हा दुसर्या दिवशी त्यांनी शहराभोवती एक वेळेस प्रदक्षिणा घातली आणि ते छावणीकडे परत आले. सहा दिवस त्यांनी असेच केले. सातव्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्या शहराला प्रदक्षिणा घातल्या, फक्त त्या दिवशी त्यांनी सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या प्रदक्षिणेच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगांचा दीर्घ निनाद केला, तेव्हा यहोशुआने सैन्याला आज्ञा केली, “जयघोष करा! कारण याहवेहनी हे शहर तुम्हाला दिले आहे! हे शहर आणि त्यातील सर्वकाही याहवेहला समर्पित करावे. राहाब वेश्या आणि जी कोणी माणसे तिच्या घरात असतील त्यांना वाचविले जावे, कारण आपण पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते. परंतु अर्पण केलेल्या सर्व वस्तूंपासून दूर राहा, म्हणजे त्यातील काहीही घेतल्याने तुम्ही स्वतःवर नाश ओढवून घेणार नाही. नाहीतर तुम्ही इस्राएलच्या छावणीच्या नाशासाठी जबाबदार ठराल आणि तिच्यावर संकट आणाल. प्रत्येक वस्तूचा तुम्ही नाश केला नाही, तर संपूर्ण इस्राएली राष्ट्रावर अनर्थ कोसळेल. सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.” जेव्हा रणशिंगांनी निनाद केला, तेव्हा सैन्याने मोठा जयघोष केला आणि रणशिंगाच्या आवाजामुळे जेव्हा पुरुषांनी मोठ्याने आवाज केला, तेव्हा तेथील भिंत कोसळून पडली; तेव्हा प्रत्येकजण सहजपणे आत गेला आणि त्यांनी ते शहर हस्तगत केले. त्यांनी ते शहर याहवेहला समर्पित केले आणि त्या शहरात जिवंत असलेल्या प्रत्येकाचा संहार केला: पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध, बैल, मेंढरे आणि गाढवे या सर्वांचा नाश केला. ज्यांनी तो देश हेरला होता त्या दोन हेरांना यहोशुआ म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्याबरोबर असलेल्या तिच्या नातेवाईकांना तुम्ही वचन दिल्याप्रमाणे बाहेर काढा.” तेव्हा ज्या तरुण पुरुषांनी तो देश हेरला होता, ते आत गेले आणि त्यांनी राहाब, तिचे वडील आणि आई, तिचे भाऊ आणि बहिणी आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. त्यांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढले आणि इस्राएलच्या छावणीबाहेरील जागेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. इस्राएली लोकांनी ते शहर व त्यातील प्रत्येक गोष्ट जाळून टाकली. फक्त चांदी व सोने, कास्य व लोखंडाची पात्रे याहवेहच्या भांडारासाठी राखून ठेवण्यात आली. परंतु यहोशुआने राहाब वेश्येस आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना वाचविले, कारण यहोशुआने यरीहोत पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते आणि इस्राएली लोकांमध्ये ते आजपर्यंत राहत आहेत. तेव्हा यहोशुआने गंभीरपणाने शपथ घेतली: “जो कोणी यरीहो शहर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करेल, तो याहवेहसमोर शापित ठरेल: “जो कोणी या शहराचा पाया घालेल; त्याचा प्रथमपुत्र मरण पावेल, आणि जो कोणी या शहराच्या वेशी उभारेल, त्याचा धाकटा पुत्र मरण पावेल.” याप्रमाणे याहवेह यहोशुआबरोबर होते आणि त्याच्या नावाची सर्वत्र किर्ती पसरली.
यहोशवा 6:1-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
(इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.) परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.” नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला.” तो लोकांना म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे.” यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे सात याजक परमेश्वरापुढे सात रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणार्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, “मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका; आज्ञा होताच जयघोष करा.” ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली; त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. सात याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसर्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे; हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपापल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरायला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.” तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंदांना आणि तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वसत आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते. त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, “जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.” ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.