यहोशवा 6:1-16
यहोशवा 6:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत, नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.” नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.” तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.” यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.” या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला. सात याजक एडक्याच्या शिंगांचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे
यहोशवा 6:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे. सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा. मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील. जेव्हा त्यांच्या रणशिंगाचा मोठा व दीर्घ आवाज तुम्ही ऐकाल, त्यावेळी संपूर्ण सैन्याने मोठा जयघोष करावा. तेव्हा शहराचा तट कोसळेल आणि सैन्य पुढे जाईल, नंतर प्रत्येकजण सरळ आत प्रवेश करेल.” तेव्हा नूनाचा पुत्र यहोशुआने याजकांना बोलाविले आणि त्यांना सांगितले, “याहवेहच्या कराराचा कोश घ्या आणि त्यासमोर सात याजक रणशिंगे घेऊन जातील.” त्याने सैनिकांना हुकूम दिला, “पुढे चला! सशस्त्र सुरक्षा सैनिकांना याहवेहच्या कोशापुढे ठेऊन शहराच्या सर्व बाजूने प्रदक्षिणा घाला.” जेव्हा यहोशुआने लोकांबरोबर बोलणे केले, तेव्हा सात याजक याहवेहच्या पुढे त्यांची सात रणशिंगे वाजवित पुढे निघाले आणि याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्यामागे गेला. सशस्त्र शिपाई रणशिंगे वाजविणार्या याजकांच्या पुढे चालू लागले आणि मागून येणारे शिपाई कोशाच्या मागे चालत राहिले. या सर्व वेळेपर्यंत रणशिंगे वाजविली जात होती. परंतु यहोशुआने सैन्याला आज्ञा दिली होती, “युद्धाची घोषणा करू नका, तुम्ही मोठ्याने जयघोष करू नका, तुमचा आवाज उंचावू नका, जयघोष करा असे मी तुम्हाला सांगेन त्या दिवसापर्यंत एकही शब्द बोलू नका.” तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. दुसर्या दिवशी सकाळीच यहोशुआ उठला आणि याजकांनी याहवेहचा कोश उचलून घेतला. सात याजक सात रणशिंगे फुंकत याहवेहच्या कोशाच्या पुढे निघाले. सशस्त्र सैनिक त्यांच्या पुढे गेले आणि रणशिंगे फुंकली जात असताना मागे जाणारे सुरक्षा सैनिक याहवेहच्या कोशाच्या मागे गेले. तेव्हा दुसर्या दिवशी त्यांनी शहराभोवती एक वेळेस प्रदक्षिणा घातली आणि ते छावणीकडे परत आले. सहा दिवस त्यांनी असेच केले. सातव्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्या शहराला प्रदक्षिणा घातल्या, फक्त त्या दिवशी त्यांनी सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या प्रदक्षिणेच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगांचा दीर्घ निनाद केला, तेव्हा यहोशुआने सैन्याला आज्ञा केली, “जयघोष करा! कारण याहवेहनी हे शहर तुम्हाला दिले आहे!
यहोशवा 6:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
(इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.) परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.” नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला.” तो लोकांना म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे.” यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे सात याजक परमेश्वरापुढे सात रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणार्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, “मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका; आज्ञा होताच जयघोष करा.” ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली; त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. सात याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसर्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे