यहोशवा 4:1-7
यहोशवा 4:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व लोक यार्देन पार करून गेले, तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड, आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.” मग यहोशवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक असे जे बारा पुरुष निवडले होते त्यांना बोलावले. यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या. म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभागले गेले; कराराचा कोश यार्देन पार करून जात असताना यार्देनेचे पाणी दुतर्फा दुभागले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी सर्वकाळ स्मारक होतील.”
यहोशवा 4:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा सर्व लोकांनी यार्देन नदी ओलांडली, तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “लोकातील प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषांची निवड कर, आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.” तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले, आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे. ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.”
यहोशवा 4:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राष्ट्रातील झाडून सारे लोक यार्देनेपलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष लोकांमधून निवडा, आणि त्यांना अशी आज्ञा दे : यार्देनेच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.” मग यहोशवाने इस्राएल लोकांतील वंशांतून एकेक असे जे बारा पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलावले. यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे एकेक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या, म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, आणि पुढे तुमची मुलेबाळे विचारतील की, ‘ह्या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे?’ तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”