यहोशवा 2:1-24
यहोशवा 2:1-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.” त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, “पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल.” पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते. त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले. इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली, ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे. कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या, तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.” तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही, तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.” तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरले, कारण तिचे घर गावकुसास लागून होते. तिने त्यांना सांगितले होते की, “तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगराकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा, तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा.” ते पुरुष तिला म्हणाले, “तू आमच्याकडून जी शपथ घेतली आहे तिच्याबाबतीत आम्हांला दोष न लागो. मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरविले, तिला हा किरमिजी दोर बांध आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू घेतली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.” ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरास पोहचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. मग ते दोघे पुरुष डोंगरावरून उतरून नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्यास सांगितले. ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.”
यहोशवा 2:1-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले. तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.” परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते. संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.” परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते. तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या. रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्या सीहोन व ओग या दोन अमोर्यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे. जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत. “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या, की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.” “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.” तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते. ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.” आता ते पुरुष तिला म्हणाले, “जेव्हा आम्ही या प्रदेशात प्रवेश करू त्यावेळेस किरमिजी रंगाचा हा दोर, ज्याने तू आम्हाला खाली सोडलेस तो तुझ्या खिडकीतून लोंबताना आम्हाला दिसला नाही आणि तुझे वडील आणि आई, तुझे भाऊ आणि तुझ्या सर्व कुटुंबाला तुझ्या घरात आणले नाहीस तर, तू जे वचन आमच्याकडून शपथ घालून घेतले आहेस, ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही. जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल. परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.” “मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.” तेव्हा तिने त्यांना पाठवून दिले आणि ते निघून गेले आणि तिने किरमिजी रंगाचा दोर तिच्या खिडकीला बांधला. जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले. नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”
यहोशवा 2:1-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ; कारण सार्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.” त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, “माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले; ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल.” पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यांत लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणार्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली, आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे; कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या; तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.” तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.” तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरवले; कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की, “तुमचा पाठलाग करणार्यांनी तुम्हांला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा; तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परत येतील; मग तुम्ही मार्गस्थ व्हा.” ते पुरुष तिला म्हणाले होते, “तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहेस तिच्या बाबतीत आम्हांला दोष न लागो; मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरवलेस, तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहवली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.” ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरवटीत पोहचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणार्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. ते यहोशवाला म्हणाले, “हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे; शिवाय, आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.”