ईयोब 42:1-17
ईयोब 42:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर ईयोबने परमेश्वरास उत्तर दिले, तो म्हणाला: “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही. तू मला विचारलेस, हा अज्ञानी मनुष्य कोण आहे जो असे मूर्खासारखे बोलतो आहे? तरीही मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या गोष्टी मी बोललो, त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो. परमेश्वरा, तू मला म्हणालास, ईयोब, तू ऐक, मी बोलेन, मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर दे. परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते, परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे. आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चाताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून पश्चाताप करील. परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला. म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत:साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हास योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मूर्ख होता म्हणून तुम्हास शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला. तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले. ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्यास पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबासह भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा आणि सोन्याची अंगठी दिली. परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता चौदा हजार मेंढ्या, सहा हजार उंट, दोन हजार गायी आणि एक हजार गाढवी आहेत. ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले. त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांप्रमाणे ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा त्यांना मिळाला. अशा तऱ्हेने ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पतवंडे पाहीपर्यंत जगला. नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.”
ईयोब 42:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग इय्योबाने याहवेहला म्हटले, “तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे; तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही. तुम्ही विचारले, ‘हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?’ खरोखर अद्भुत आणि माझ्या समजबुद्धीत नसणार्या गोष्टी, त्याविषयी मी बोललो. “तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; मी तुला प्रश्न करणार, आणि तू मला उत्तर देशील.’ माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे. म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.” याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, “मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत. म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही.” मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली. इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे व सोन्याची अंगठी दिली. याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती. आणि त्याला सात मुले व तीन मुली होत्या. त्याने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसरीचे कसीया व तिसरीचे केरेन-हप्पूक असे ठेवले. संपूर्ण देशामध्ये इय्योबाच्या मुलींएवढ्या सुंदर मुली कुठेही नव्हत्या; त्यांच्या पित्याने त्यांच्या भावांबरोबर त्यांनाही वतन दिले. त्यानंतर इय्योब एकशेचाळीस वर्षे जगला; त्याने आपली लेकरे व त्यांची लेकरे अशा चार पिढ्या पाहिल्या. इय्योब वयस्कर व पूर्ण परिपक्व होऊन मरण पावला.
ईयोब 42:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ईयोब परमेश्वराला म्हणाला, “तुला सर्वकाही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. ह्यास्तव मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. आता ऐक; मी बोलतो! मी तुला विचारतो, तू मला बोध कर, मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे; म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.” परमेश्वराचे ईयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलीफज तेमानीला म्हणाला, “तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील; कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन; म्हणजे मग माझा सेवक ईयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हांला मिळणार नाही.” हे ऐकून अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी ह्यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; आणि परमेश्वराने ईयोबावर अनुग्रह केला. ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले; आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले; प्रत्येकाने त्याला एक कसीटा1 व एक सोन्याची अंगठी दिली. परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे नाव कसीया व तिसरीचे केरेनहप्पूक अशी त्यांची नावे त्याने ठेवली. ईयोबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या; त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावांप्रमाणेच वतन वाटून दिले. त्यानंतर ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला; आणि त्याने चार पिढ्यांपर्यंत आपले पुत्रपौत्र पाहिले. नंतर ईयोब वृद्ध व पुर्या वयाचा होऊन मरण पावला.