YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 38:1-41

ईयोब 38:1-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला, कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द? आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे. मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे. जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का? तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली? जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला. जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले. मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील. तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का? तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का? पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे. सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग. प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो? तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का? तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का? मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो. सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का? जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला? वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो? निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते. पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात? हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो? पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो. तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का? तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का? तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का? तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का? तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का? लोकांस शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो? ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो? त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात. तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का? ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात. कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?

सामायिक करा
ईयोब 38 वाचा

ईयोब 38:1-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले: “हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो? पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर देशील. “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजत असेल तर सांग. तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले? तिचे पाये कशावर रोवले आहे, किंवा तिची कोनशिला कोणी बसवली— जेव्हा प्रभात तार्‍यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता? “सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले, जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले, जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली, जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’? “तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे, यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील? जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते; आणि वस्त्रासारखी त्याची मुद्रा उठून दिसते. दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो, आणि त्यांचा उगारलेला हात मोडला जातो. “समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय? मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय? अति खोल अंधकाराचे दरवाजे तू पाहिलेस काय? पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का, हे सर्व जर तू जाणतोस तर मला सांग. “प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे? आणि अंधार कुठे वस्ती करतो? त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय? तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस! “हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय? जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो? आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते, किंवा जिथून पूर्वेचा वारा पृथ्वीवर विखुरला जातो, त्याचा मार्ग कुठे आहे? मुसळधार पावसासाठी प्रवाह, आणि वादळी पावसाची वाट कोण खणतात, म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत, निर्जन वाळवंटामध्ये पाणी पुरवठा करू शकेल, यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल व तिथे गवत उगवू शकेल? पावसाला पिता आहे का? दहिवराच्या थेंबांचा पिता कोण आहे? बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो? “कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय? तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय? स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय? “ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय? आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय? पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला? मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील? “सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का? ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात? कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?

सामायिक करा
ईयोब 38 वाचा

ईयोब 38:1-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला, “अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला हे विचारतो; मला सांग. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे? तिला मापनसूत्र कोणी लावले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसवली? त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला. समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला? त्या समयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरूण घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले; मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्याला अडसर व दरवाजे लावले; आणि मी म्हणालो, ‘तू येथवरच ये; ह्यापलीकडे तू येता कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत.’ तू जन्मात कधी प्रातःसमयाचे नियमन केले आहेस काय? प्रभातेला आपले स्थान दाखवून दिले आहेस काय? ह्यासाठी की त्याने पृथ्वीच्या दिगंतास धरून तिच्यावरील दुष्टांना झटकून टाकावे; तेव्हा मुद्रेच्या ठशाने जसा मातीला आकार येतो, तसा प्रभातेने पृथ्वीचा आकार व्यक्त होतो; सर्व वस्तू जशा काय त्याच्या पेहरावाप्रमाणे ठळक दिसतात. दुष्टांकडून त्यांचा प्रकाश काढून घेतला जाईल; त्यांचा उगारलेला हात मोडतो. समुद्राच्या झर्‍यापर्यंत तुझा कधी रिघाव झाला आहे काय? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहेस काय? मृत्यूची द्वारे तुला प्रकट झाली आहेत काय? तू अधोलोकाची द्वारे पाहिली आहेत काय? पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय? तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग. प्रकाश वसतो तिकडची वाट कोणती? अंधकाराचे स्थान कोठे आहे? त्याला त्याच्या प्रदेशात सीमेपर्यंत नेऊन तुला पोचवता येईल काय? त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस काय? हे सर्व तुला ठाऊक असेलच; कारण त्या वेळी तू जन्मला असावास; तू बहुत दिवसांचा म्हणायचा. तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध ह्यांच्या प्रसंगासाठी राखून ठेवली आहेत. प्रकाशाची वाटणी कशी झाली आहे? पूर्वेचा वारा पृथ्वीवर कसा पसरतो? पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडतो? गर्जणार्‍या विद्युल्लतेला मार्ग कोणी करून दिला? अशासाठी की निर्जन प्रदेशात, मनुष्यहीन अरण्यात पाऊस पडावा, उजाड व वैराण प्रदेश तृप्त करावा, कोवळी हिरवळ उगवेशी करावी. पर्जन्याला कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूंना कोण जन्म देतो? हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? आकाशातील हिमकणांना कोण जन्म देतो? जल थिजून पाषाणाप्रमाणे घट्ट होते; जलाशयाचा पृष्ठभाग गोठून जातो. कृत्तिकांचा गुच्छ तुला गुंफता येईल काय? मृगशीर्षाचे बंध तुला सोडता येतील काय? राशिचक्र योग्य समयी तुला उदयास आणता येईल काय? सप्तऋषींना त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखवता येईल काय? आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय? तुझ्यावर विपुल जलवर्षाव व्हावा म्हणून मेघांना तुला पुकारून सांगता येईल काय? विद्युल्लता तुझ्या आज्ञेत आहेत काय? आणि त्या येऊन, ‘काय आज्ञा,’ असे तुला म्हणतात काय? घनमेघांत अक्कल कोणी घातली? अभ्रांना समज कोणी दिली? कोणाला आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हजेरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओततो? तेव्हा धूळ भिजून गोळा बनतो. व ढेकळे विरघळून एकमेकांना चिकटून जातात. तुला सिंहिणीची शिकार करता येते काय? तरुण सिंहाची क्षुधा तुला तृप्त करता येते काय? ते गुहांत दबा धरून बसतात, जाळीत दडून टपून बसतात. कावळ्याची पिले देवाला हाका मारतात; ती अन्नान्न करीत चोहोकडे भटकतात.

सामायिक करा
ईयोब 38 वाचा