ईयोब 28:12-28
ईयोब 28:12-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही, पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत. पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’ तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही. तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही. शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही. शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे. इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही, शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही. मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत. मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’ फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे. देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते. देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले. पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले. तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली. आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”
ईयोब 28:12-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु ज्ञान कुठे सापडेल? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? मानवाला त्याचे मोल अवगत नाही; जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही. महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”; आणि समुद्र म्हणतो, “ते माझ्याकडे नाही.” अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही, किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही. ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी, यांनीही त्याचे मोल करता येणार नाही. सोने आणि रत्ने किंवा, शुद्ध सोन्याचे अलंकार त्या ज्ञानाच्या तुलनेत बसत नाही. प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको; ज्ञानाचे मोल माणकांपेक्षाही खूपच अधिक आहे. कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही, आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही. तर मग ज्ञान कुठून येते? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे, आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे. विनाश आणि मृत्यू म्हणतात, “की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.” परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो ते कुठे आढळेल, हे फक्त त्यांनाच माहीत आहे. कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात. आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते. जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली आणि जलांचे माप घेतले, जेव्हा त्यांनी पावसाला नियम, आणि गर्जणार्या विजेला मार्ग आखून दिला, तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले; त्याची पुष्टी करून त्याची पारख केली. याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले, “प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे, वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.”
ईयोब 28:12-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरीपण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवाला कळत नाही; ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो, ‘ते माझ्या ठायी नाही;’ समुद्रही म्हणतो, ‘ते माझ्याजवळ नाही.’ उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही; चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व काचमणी ही त्याच्या बरोबरीची नाहीत; उंची सोन्याच्या नगांनी त्याचा मोबदला होत नाही. प्रवाळ व स्फटिक ह्यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे. कूश देशाचा पुष्कराज त्याच्या तोडीचा नाही; बावनकशी सोने त्याच्याशी तुल्य नाही. तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे; आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे. विनाशस्थान1 व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे. देवच त्याचा मार्ग जाणतो; त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे. कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंतांना पोचते; तो आकाशमंडळाखालचे सर्वकाही पाहतो. त्याने वायूचे वजन ठरवले व जल मापून दिले; त्याने पर्जन्यास नियम लावून दिला; गर्जणार्या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला; तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले; त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणले. तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’