ईयोब 14:1-17
ईयोब 14:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे. तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते. अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय? अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही. मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे, मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही. तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल. वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात. त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले. तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्यास नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात. परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो. जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते. मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही. तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल. मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन. तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन. पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस. तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस.
ईयोब 14:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन, अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे. अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते; क्षणभंगुर सावलीप्रमाणे ते जास्त काळ टिकत नाही. अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का? त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का? अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल? कोणीही नाही! मानवाचे दिवस ठरलेले आहेत; त्याच्या महिन्यांची संख्या तुमच्या स्वाधीन आहे आणि त्याची नेमलेली मर्यादा त्याला ओलांडता येत नाही. रोजगाराच्या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत, आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या. “झाडाला देखील आशा असते: की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत. मातीत त्याची मुळे जुनी झाली असली, आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला, तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात. परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते; तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो. जसे सरोवराचे पाणी आटते किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते, तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत. “तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते! आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा आणि मग माझी आठवण करावी! जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? माझ्या सर्व कठीण श्रमाच्या दिवसात माझ्या सुटकेची मी वाट पाहीन. मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन; आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल. तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही, तर माझ्या पावलांची मोजणी कराल. तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून; माझ्या पापांवर पांघरूण घालाल.
ईयोब 14:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही. अशावर तू डोळा ठेवतोस काय? अशा मला तू आपल्या न्यायासनासमोर नेतोस काय? अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही. मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे; त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे; तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस, ती त्याला ओलांडता येत नाही; म्हणून त्याच्यावरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे; मजूर रोज भरतो तसे त्याला आपले दिवस भरू दे. वृक्षांची काहीतरी आशा असते; तो तोडला तरी पुन्हा फुटतो; त्याला धुमारा फुटायचा राहत नाही. जमिनीत त्याचे मूळ जून झाले असले, त्याचे खोड मातीत सुकून गेले असले; तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते, नव्या रोपाप्रमाणे त्याला फांद्या येतात; पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो? समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते; तसा मनुष्य पडला म्हणजे तो पुन्हा उठत नाही; आकाशाचा विलय होईतोवर तो जागृत होणार नाही; आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही. तू मला अधोलोकात लपवशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेवशील, माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल! मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या माझ्याविषयी तुला उत्कंठा लागेल; पण सध्या तू माझे एकेक पाऊल मोजत आहेस; माझ्या पापावर तू सक्त नजर ठेवत आहेस ना? माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहेस; माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवतोस.