योहान 8:3-11
योहान 8:3-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”
योहान 8:3-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नियमशास्त्र शिक्षक व परूशी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्यांच्याकडे आणले. त्यांनी तिला समुदायाच्या पुढे उभे केले आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?” ते या प्रश्नाचा उपयोग त्यांना सापळ्यात पकडावे व दोष ठेवण्यास आधार मिळावा म्हणून करत होते. परंतु येशू खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागले. ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.” मग ते पुन्हा खाली वाकून जमिनीवर लिहू लागले. ज्यांनी हे ऐकले, ते सर्वजण प्रथम वयस्कर व नंतर एका पाठोपाठ एक असे सर्वजण निघून गेले आणि शेवटी येशू एकटेच त्या स्त्रीसोबत राहिले, ती स्त्री अद्याप तिथेच उभी होती. मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?” ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.”
योहान 8:3-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या वेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.]
योहान 8:3-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्या वेळी त्याच्याकडे आणले. तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरुजी, ही स्त्री प्रत्यक्ष व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला. ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.” तो पुन्हा ओणवा होऊन जमिनीवर लिहू लागला. हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती. येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?” ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”]