योहान 8:1-24
योहान 8:1-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला, नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.” पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” यावरुन परूशी त्यास म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही. तुम्ही देहानुसार न्याय करता; मी कुणाचा न्याय करीत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोसुध्दा आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.” यावरुन ते त्यास म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” तो परमेश्वराच्या भवनात शिकवीत असताही वचने जामदारखान्यात बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती. पुन्हा तो त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.” यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही. म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”
योहान 8:1-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले. अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले. नियमशास्त्र शिक्षक व परूशी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्यांच्याकडे आणले. त्यांनी तिला समुदायाच्या पुढे उभे केले आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?” ते या प्रश्नाचा उपयोग त्यांना सापळ्यात पकडावे व दोष ठेवण्यास आधार मिळावा म्हणून करत होते. परंतु येशू खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागले. ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.” मग ते पुन्हा खाली वाकून जमिनीवर लिहू लागले. ज्यांनी हे ऐकले, ते सर्वजण प्रथम वयस्कर व नंतर एका पाठोपाठ एक असे सर्वजण निघून गेले आणि शेवटी येशू एकटेच त्या स्त्रीसोबत राहिले, ती स्त्री अद्याप तिथेच उभी होती. मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?” ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.” येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” यावर परूशी त्यांना आव्हान देत म्हणाले, “येथे आपण, आपल्या स्वतःविषयी साक्ष देता; म्हणून तुमची साक्ष सबळ वाटत नाही.” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो, तरी माझी साक्ष सबळ आहे, कारण मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे, हे मला माहीत आहे. परंतु मी कुठून येतो व मी कुठे जातो याची तुम्हाला काही कल्पना नाही. तुम्ही मानवी मापदंडाने न्याय करता; परंतु मी कोणाचाही न्याय करीत नाही. मी न्याय केलाच, तर माझे निर्णय खरे आहेत, कारण मी एकटाच नाही, तर ज्या पित्याने मला पाठविले तेही माझ्याबरोबर असतात. तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की दोन साक्षीदारांची साक्ष खरी मानावी. मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठविले ते माझे दुसरे साक्षीदार आहेत.” तेव्हा त्यांनी विचारले, “तुझा पिता कुठे आहे?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी व माझा पिता कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” मंदिराच्या अंगणाच्या जवळ जिथे दानार्पण टाकीत असत तिथे शिकवीत असताना ते ही वचने बोलले, तरीसुद्धा त्यांना कोणीही धरले नाही, कारण त्यांची वेळ तेव्हापर्यंत आली नव्हती. मग पुन्हा येशू त्यांना म्हणाले, “मी जाणार आहे आणि तुम्ही माझा शोध कराल व तुमच्या पापात मराल. मी जिथे जाणार तिथे तुम्हाला येता येणार नाही.” यामुळे यहूदी म्हणू लागले, “ ‘मी जिथे जातो, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ म्हणजे तो आत्महत्या करेल की काय?” परंतु ते पुढे म्हणाले, “तुम्ही खालचे आहात; मी तर वरून आहे. तुम्ही या जगाचे आहात; तसा मी या जगाचा नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.”
योहान 8:1-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्या वेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.] पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” ह्यावरून परूशी त्याला म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही. तुम्ही देहबुद्धीने न्याय करता; मी कोणाचा न्याय करत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे; कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही; तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. ह्यानंतर येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापांत मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” ह्यावर यहूदी म्हणाले, “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे, तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.”
योहान 8:1-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू ऑलिव्ह डोंगरावर गेला. भल्या पहाटेस तो पुन्हा मंदिरात गेला. तेव्हा लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्या वेळी त्याच्याकडे आणले. तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरुजी, ही स्त्री प्रत्यक्ष व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला. ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.” तो पुन्हा ओणवा होऊन जमिनीवर लिहू लागला. हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती. येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?” ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”] येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” परुशी त्याला म्हणाले, “तुम्ही आता स्वतःविषयी साक्ष देत आहात, त्यामुळे तुमची साक्ष खरी नाही.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष देत असलो तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो व कुठे जातो, हे मला ठाऊक आहे. मी कुठून आलो व कुठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही. तुम्ही मानवी मापदंड वापरून न्याय करता. मी कोणाचा न्याय करत नाही. परंतु जर मी कोणाचा न्याय केला, तर माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर ज्याने मला पाठवले, तो पिता माझ्याबरोबर आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी असते. मी स्वतःविषयी साक्ष देतो आणि ज्या पित्याने मला पाठवले, तोही माझ्याविषयी साक्ष देतो.” ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “तुमचा पिता कुठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्याला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” मंदिरात शिकवत असताना दानपेट्या ठेवण्याच्या खोलीत तो ही वचने बोलला. परंतु त्याला कोणी अटक केली नाही कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जाईन आणि तुम्ही मला शोधाल परंतु तुम्ही तुमच्या पापांत मराल. मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” तेव्हा यहुदी अधिकारी म्हणाले, “‘मी जेथे जातो, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, असे हा म्हणतो, ह्याअर्थी हा आत्महत्या तर करणार नाहीना?” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात परंतु मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात परंतु मी ह्या जगाचा नाही. ह्यामुळे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही तुमच्या पापांत मराल कारण मी जो आहे, तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही तुमच्या पापांत मराल.”