योहान 17:1-26
योहान 17:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत. कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे. आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे. आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा. तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाचा पाया घातला त्यापुर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
योहान 17:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे म्हटल्यावर, येशूंनी वर आकाशाकडे दृष्टी लावून प्रार्थना केली: “हे पित्या, वेळ आली आहे, आपल्या पुत्राचे गौरव करा, यासाठी की पुत्राने आपले गौरव करावे; आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तुम्ही दिलेले कार्य समाप्त करून मी तुम्हाला पृथ्वीवर गौरव प्राप्त करून दिले आहे. तर आता, हे पित्या, जग स्थापन होण्यापूर्वी जे माझे गौरव तुमच्या समक्षतेत होते त्याच्यायोगे माझे गौरव करा. “तुम्ही मला या जगातील जे लोक दिले, त्यांच्यासमोर मी तुम्हाला प्रगट केले आहे. ते तुमचे होते; तुम्ही ते सर्वजण मला दिले आणि त्यांनी तुमचे वचन पाळले आहे. आता त्यांना कळले आहे की, जे काही तुम्ही मला दिले आहे ते तुमच्यापासून आहे. कारण तुम्ही मला दिलेली वचने मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली आहेत. त्यांना खात्रीपूर्वक समजले की मी तुमच्यापासून आलो आणि तुम्ही मला पाठविले आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, परंतु जे तुम्ही मला दिले आहेत आणि ते आपले आहेत त्यांच्यासाठी करतो. जे सर्व माझे आहेत ते तुमचेच आहेत आणि जे सर्व तुमचे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे मला गौरव मिळाले आहे. आता मी या जगात राहणार नाही, मी तुमच्याकडे येत आहे, परंतु ते या जगात अजूनही आहेत. पवित्र पित्या, जे नाव तुम्ही मला दिले आहे, त्या नावाच्या सामर्थ्याने त्यांना सुरक्षित ठेवा, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत जे नाव तुम्ही मला दिले, त्याद्वारे मी त्यांना राखले व सुरक्षित ठेवले आणि जो नाशाचा पुत्र आहे त्याच्याशिवाय एकाचाही नाश झाला नाही, यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा. “आता मी तुमच्याकडे येत आहे, परंतु मी या जगात असतानाच हे सांगत आहे, यासाठी की माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा. मी त्यांना तुमचे वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे. जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.” सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे. जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे. त्यांनी देखील खरोखर पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतो. “माझी प्रार्थना केवळ त्यांच्यासाठीच नाही. जे त्यांच्या संदेशाद्वारे मजवर विश्वास ठेवतील मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल. तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे. “हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे. “हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे. मी तुमच्या नाव त्यांच्यासमोर प्रकट केले आहे, मी तुम्हाला प्रकट करीतच राहीन, जेणे करून जी तुमची प्रीती मजवर आहे ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
योहान 17:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर; कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
योहान 17:1-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या गोष्टी बोलल्यावर येशू आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू तुझ्या पुत्राचा गौरव कर. तू त्याला जे दिले आहेत त्या सर्वांना त्याने शाश्वत जीवन द्यावे म्हणून तू सर्व मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहेस. शाश्वत जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे कार्य तू मला करायला दिलेस, ते पुरे करून मी तुझा पृथ्वीवर गौरव केला आहे. हे माझ्या पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी तुझ्याबरोबर माझे जे वैभव होते, तेच वैभव तुझ्या उपस्थितीत मला आता दे. जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस. त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस, ते सर्व तुझ्याकडून आले आहे. जी वचने तू मला दिलीस, ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्याकडून आलो, हे ते ओळखतात आणि तू मला पाठवले आहेस, असा ते विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. जे माझे आहेत ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही परंतु ते मात्र ह्या जगात आहेत. आता मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून, तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे संरक्षण कर. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावाने मी त्यांचे संरक्षण केले. मी त्यांचा सांभाळ केला. ज्याचा विनाश अटळ आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामधील कोणीही हरवला नाही. धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी ह्या गोष्टी जगात बोलत आहे. मी त्यांना तुझा संदेश कळवला आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. सत्यात तू त्यांना तुझ्याकरता समर्पित करून घे. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसेच मी त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही तुझ्याकरता समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला तुझ्यापुढे समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांनी सांगितलेल्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करत आहे की, त्या सर्वांनी एक व्हावे. पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे. म्हणजे तू मला पाठवले आहेस, असा विश्वास जगाने ठेवावा. जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणून तू मला दिलेल्या वैभवात मी त्यांना सहभागी केले आहे. त्यांनी पूर्णपणे एक व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आहेस आणि तू जशी माझ्यावर प्रीती करतोस तशी त्यांच्यावरही प्रीती करतोस. जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस म्हणून हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे, तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे वैभव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. हे नीतिमान पित्या, जग तुला ओळखत नाही. मी तुला ओळखतो आणि तू मला पाठवलेस, हे त्यांना ठाऊक आहे. मी तुझे नाव त्यांना सांगितले आहे आणि पुढेही सांगत राहीन. त्यामुळे, जी प्रीती तू माझ्यावर करतोस, ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि मीसुद्धा त्यांच्यामध्ये असावे.”