योहान 11:9-15
योहान 11:9-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो; पण जर कोणी रात्री चालतो तर त्यास ठेच लागते कारण त्याच्याठायी उजेड नाही.” येशू या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्यास झोपेतून उठवावयास जातो.” म्हणून त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “प्रभूजी, त्यास झोप लागली असेल तर तो बरा होईल.” आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता. झोपेतून मिळण्याऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. मग येशूने उघडपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे. आणि मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ या.”
योहान 11:9-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.” असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.” त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल.” येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत. मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे, तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”
योहान 11:9-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.” ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणार्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मेला आहे; आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.”
योहान 11:9-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो. परंतु तो रात्री चालला तर त्याला ठेच लागते, कारण तेव्हा उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.” शिष्य त्याला म्हणाले, “प्रभो, त्याला झोप लागली असेल, तर त्याला बरे वाटेल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.” तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी तेथे नव्हतो, ह्याचा मला आनंद वाटतो. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”