YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 9:10-24

यिर्मया 9:10-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत. म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.” या गोष्टी समजण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय? या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली. परमेश्वर म्हणाला, “हे असे झाले कारण, त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यांनी माझी वाणी ऐकाण्यास आणि त्यावर चालण्यास नकार दिला. हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.” यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन. नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या. त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा. म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल. सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत.” तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा. कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे. असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत. परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.” पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.

सामायिक करा
यिर्मया 9 वाचा

यिर्मया 9:10-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. आणि जनावरेही गेली आहेत. “मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.” हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही? याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही. याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.” म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन. जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “विचार करा! आक्रंदन करणार्‍या स्त्रियांना बोलवा; त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा. त्यांना त्वरित येऊ द्या आणि आमच्यासाठी आक्रोश करतील व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील. सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ” आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा. कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे. त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: “ ‘मृतदेह उघड्या जागांवर विष्ठेप्रमाणे पसरली जातील; कापणार्‍यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ” याहवेहने असे म्हणतात: “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये. जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”

सामायिक करा
यिर्मया 9 वाचा

यिर्मया 9:10-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत. यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.” हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला? परमेश्वर म्हणतो, “मी त्यांच्यापुढे ठेवलेले माझे नियमशास्त्र त्यांनी सोडले, त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत. तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले. ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन, आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “विचार करा, मोलाने ऊर बडवणार्‍या स्त्रियांना बोलावून आणा, कुशल स्त्रियांना आमंत्रण करा; त्यांनी त्वरा करून आमच्यासाठी शोकगीत म्हणावे म्हणजे आमच्या नेत्रांतून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहतील. कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’ स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत; तुम्ही आपल्या कन्यांना विलापगीत शिकवा. एकमेकींना शोकगीत शिकवा. कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे. हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्‍याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’ परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये; बाळगायचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा; ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो.”

सामायिक करा
यिर्मया 9 वाचा