यिर्मया 7:1-34
यिर्मया 7:1-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले: यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस. कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला, जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत:चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस, तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही. तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल, मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल. ज्या घराला माझे नाव आहे, ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पाहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा. इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही. म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन. एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन. यिर्मया, तुला सांगतो, या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी याचना व आळवणीही करु नकोस किंवा त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. कारण मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही. ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय? मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत. परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत:लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी. यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी या जागेवर माझा संताप मनुष्यांवर, प्राण्यांवर, झाडांवर आणि पिकांवर येईल, तो जाळून टाकणार आणि कोणीही तो विझवू शकणार नाही.” सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली होमार्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा. कारण मी जेव्हा तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्या कडे काहीएक मागीतले नाही, मी त्यांना होमार्पणे आणि यज्ञ यांबद्दल आज्ञा दिली नाही. मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला, म्हणजे तुमचे चांगले होईल. पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले. तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले. पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते “तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषीत केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत. म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांग. ज्या राष्ट्रांने परमेश्वराचे म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि शिक्षा घेतली नाही, ते हेच आहे. सत्यता ही त्यांच्या मुखातून छेदून टाकलेली आहे. हे यरूशलेमे, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगरमाथ्यावर जाऊन शोकगीत गा. कारण परमेश्वराने रागाच्या भरात या पिढीला नाकारले आणि सोडले आहे. कारण परमेश्वर असे म्हणतो, यहूदाच्या लोकांस पापे करताना मी पाहिले आहे.” त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी, ज्या घराला माझे नाव आहे, ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत. आणि त्यांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्याठिकाणी ते स्वत:च्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही. परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. “पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल. यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”
यिर्मया 7:1-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: “याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका. इस्राएलचे सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुमच्या मार्गाची व वर्तणुकीची सुधारणा करा, मग मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन. तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!” तुम्ही तुमचे मार्ग व वर्तणूक खरोखर बदलली तर व इतरांशी न्यायाने वागाल, जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही, तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन. परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत. “ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून, आणि मग येथे येऊन, ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे, त्या मंदिरात माझ्यासमोर उभे राहता व म्हणता “आम्ही सुरक्षित आहोत;” हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी सुरक्षित आहात काय? हे मंदिर ज्याने माझे नाव धारण केले आहे, तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झाली आहे काय? परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिले आहे! अशी याहवेह घोषणा करीत आहेत. “ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा. याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही. म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन. मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’ “म्हणून या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, किंवा यांच्यासाठी माझ्याकडे विनंती किंवा विनवण्या करू नकोस. कारण मी तुझे ऐकणार नाही. यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का? मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात. याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का? “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही. “ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा! तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती, पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली. तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो. परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’ “जेव्हा हे सर्व तू त्यांना सांगशील, ते तुझे ऐकणार नाहीत; तू त्यांना हाक मारशील, पण ते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत. म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे. “ ‘आपले केस कापून टाक, ते फेकून दे; आणि वनस्पतिहीन पर्वतावर विलाप कर, कारण याहवेहने आपल्या क्रोधामुळे या पिढीला धिक्कारले आहे व त्यांचा त्याग केला आहे. “ ‘याहवेह म्हणतात, यहूदीयाच्या लोकांनी माझ्या दृष्टीत पाप केले आहे. ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्ती ठेवून, ते मंदिर भ्रष्ट केले आहे. बेन-हिन्नोमच्या खोर्यात त्यांनी तोफेत नावाची एक उच्च वेदी बांधली आहे—तिथे त्यांच्या दैवतांना ते आपल्या मुलामुलींचे होमबली देतात—अशी आज्ञा मी त्यांना मुळीच दिली नव्हती, असे भयानक कृत्य माझ्या कधी मनातही आले नाही. म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही. नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही. तेव्हा मी हर्षगीते व आनंदाचे गायन आणि वर-वधू यांचे आनंदी बोल यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावरून संपविणार आहे, कारण संपूर्ण भूमी उजाड अशी होईल.
यिर्मया 7:1-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे : “परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर : यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. ‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल, परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाले आहे काय? पाहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही; म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या ह्या मंदिराचे आणि तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी दिलेल्या ह्या स्थळाचे, शिलोचे केले तसे करीन; आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन. ह्याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस; कारण मी ऐकणार नाही. यहूदाच्या नगरांत, यरुशलेमेच्या रस्त्यांत ते काय करतात ते तू पाहतोस ना? मुलेबाळे काटक्या जमा करतात, वडील माणसे अग्नी पेटवतात, आणि आकाशराणीप्रीत्यर्थ पोळ्या कराव्यात व अन्य देवांना पेयार्पणे द्यावीत म्हणून स्त्रिया कणीक तिंबतात; असे ते मला क्रोधास पेटवतात. परमेश्वर म्हणतो, ते मला संताप आणतात? का स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात? ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.” सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, “तुमच्या यज्ञबलींत आपल्या होमबलींची भर घाला व मांस खात जा. तुमच्या पूर्वजांना मी मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवशी होमबलींविषयी किंवा यज्ञबलींविषयी मी त्यांना काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही. तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की, ‘माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल; तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हांला सांगतो त्याने चाला.’ तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत. तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजवर माझे सर्व सेवक जे संदेष्टे तुमच्याकडे मी पाठवत आलो, त्यांना मोठ्या निकडीने पाठवत आलो; पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले. तू ही सर्व वचने त्यांना सांगशील तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाहीत. त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे. हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’ कारण यहूदावंशाने माझ्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे; माझे नाम ज्या मंदिरास दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अमंगळ वस्तू त्यात ठेवल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो. आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती. ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत लोक इत:पर त्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत तर ‘वधाचे खोरे’ म्हणतील आणि जागेच्या अभावी तोफेतात प्रेते पुरतील. ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही. हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.