यिर्मया 42:1-22
यिर्मया 42:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले. ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर. आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.” मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.” मग ते यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरूद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार होवो. ते चांगले असो किंवा जर ते वाईट असले तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहो त्याची वाणी आम्ही ऐकू. अशासाठी की, जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्याबरोबर चांगले व्हावे.” मग दहा दिवसानंतर असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले. आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो, जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही; मी तुम्हास लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते. ज्या बाबेलाच्या राजाला तुम्ही भीत आहात, त्यास भिऊ नका. हे परमेश्वराचे निवेदन आहे. कारण तुमचे रक्षण करणास आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास, मी तुमच्याबरोबर आहे. कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणील. पण कदाचित् तुम्ही म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही. जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही कदाचित् म्हणाल, नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू. तर आता यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चित करता, तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हास गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल. म्हणून असे घडेल की, जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तलवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिसरात जाऊ नका. तुम्ही खरोखर जाणून घ्या आज मी तुम्हाविरुध्द साक्ष दिली आहे. कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला. कारण आज मी तुम्हास ते सांगितले आहे, पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरीने मराल.”
यिर्मया 42:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मयाह संदेष्ट्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही सर्व उरलेल्या लोकांसाठी याहवेह, तुझे परमेश्वर यांची प्रार्थना कर. कारण आम्ही पूर्वी पुष्कळ होतो, आता फारच थोडे उरलो आहोत, हे तू पाहतोस. आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.” यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.” त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील. त्यांचा संदेश आम्हाला अनुकूल असो वा प्रतिकूल, आम्ही आमच्या याहवेहच्या आज्ञा पाळू, आम्ही तुला ज्यांच्याकडे विनंती करण्यास पाठवित आहोत, त्या आमच्या परमेश्वर याहवेहचे आम्ही ऐकू.” दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले. तेव्हा त्याने कारेहाचा पुत्र योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाप्रमुख व सर्व लहान थोर लोक यांना एकत्र बोलाविले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात: ‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे. आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन. त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’ “परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही, आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’ तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल, तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल. तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’ कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’ “कारण याहवेहने तुम्हाला म्हटले आहे. ‘अहो यहूदीयातील अवशिष्ट लोकांनो, इजिप्तमध्ये जाऊ नका! आज मी तुम्हाला इशारा दिला आहे, तो कधी विसरू नका. तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’ याहवेह तुमचे परमेश्वर यांनी जे सांगण्यास मला तुमच्याकडे पाठविले, ते मी तुम्हाला आज सांगितले, परंतु तुम्ही ते अद्यापि पाळले नाही. म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.”
यिर्मया 42:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन, यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की, आम्ही कोणत्या मार्गाने जावे व काय करावे हे परमेश्वर आपला देव ह्याने आम्हांला दाखवावे.” मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे म्हणणे ऐकले आहे; पाहा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर तुमचा देव ह्याची प्रार्थना करीन व जे काही परमेश्वर तुमच्याविषयी सांगेल ते मी तुम्हांला कळवीन; तुमच्यापासून काही लपवणार नाही.” ते यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वर आपला देव आपल्या हस्ते जे वचन आम्हांला सांगून पाठवील त्या सर्वांप्रमाणे आम्ही न केले तर परमेश्वर आमच्याविरुद्ध खरा विश्वसनीय साक्षी असो. परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे आम्ही आपणाला पाठवतो; त्याचे म्हणणे बर्याचे असो की वाइटाचे असो आम्ही ते ऐकू; म्हणजे परमेश्वर आमचा देव ह्याची वाणी ऐकल्यावर आमचे कल्याण होईल.” दहा दिवसांनी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले. तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबरचे सैन्यांचे सर्व नायक व लहानथोर सर्व लोक ह्यांना त्याने बोलावले, आणि त्यांना म्हटले, “तुम्ही आपली विनंती इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यापुढे सादर करण्यास मला पाठवले; तो असे म्हणतो, ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे. ज्या बाबेलच्या राजाची तुम्ही भीती धरता त्याला भिऊ नका; परमेश्वर म्हणतो, त्याला भिऊ नका; कारण तुमचा बचाव करण्यास व त्याच्या हातून तुम्हांला मुक्त करण्यास मी तुमच्याबरोबर आहे. मी तुमच्यावर दया करीन म्हणजे त्याची दया तुमच्यावर होईल व तो तुम्हांला तुमच्या देशात वस्ती करू देईल; पण तुम्ही जर म्हणाल, ‘आम्ही ह्या देशात राहणार नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकणार नाही,’ आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’ तर अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मिसर देशात जाऊन तेथे काही दिवस राहण्याचा तुमचा निश्चय असला तर ज्या तलवारीची तुम्हांला भीती वाटत आहे ती मिसर देशात तुम्हांला गाठील, व ज्या दुष्काळाची तुम्हांला भीती वाटते, तो मिसर देशात तुमच्या पाठोपाठ येईल; तेथे तुम्ही मराल. ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही. “कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही. अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे की, ‘मिसर देशात जाऊ नका, मी तुम्हांला आज बजावून सांगत आहे हे पक्के लक्षात ठेवा.’ ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू. ते आज मी तुम्हांला कळवले आहे; तरी परमेश्वर तुमचा देव ह्याने माझ्या द्वारे तुम्हांला जे सांगून पाठवले त्यांतल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही. म्हणून ज्या स्थळी जाऊन राहण्याची तुमची इच्छा आहे तेथे तुम्ही तलवार, दुष्काळ, दुर्भिक्ष व मरी ह्यांनी मराल हे पक्के समजा.”