YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 38:1-28

यिर्मया 38:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता, “परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील. परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.” म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो. मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.” मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला. आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला, माझ्या स्वामी राजा, या मनुष्यांनी ज्या मार्गाने यिर्मया संदेष्ट्याबरोबर वाईट वागणूक केली. तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही. नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.” म्हणून एबद-मलेख याने त्या मनुष्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यांना घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारात खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरांनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या. एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले. नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला. नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.” यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “जर मी तुला सांगितले, तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस.” पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही. मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील. पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.” सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील” यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल. पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे. यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत. कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खास्द्यांकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलाच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल.” मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही. मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हास सांग. आमच्यापासून लपवून ठेवू नको अथवा आम्ही तुला ठार मारू आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हास सांग मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको. नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते. ह्याप्रमाणे यिर्मया, यरूशलेम जिंकले जाईपर्यंत, पहारेकऱ्याच्या चौकात राहिला.

सामायिक करा
यिर्मया 38 वाचा

यिर्मया 38:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परंतु यिर्मयाह लोकांना काय सांगत आहे हे मत्तानचा पुत्र शफाट्याह, पशहूरचा पुत्र गदल्याह, शेलेम्याहचा पुत्र युकाल व मल्कीयाहचा पुत्र पशहूर यांनी ऐकले. यिर्मयाह सांगत होता, “याहवेह असे म्हणतात: ‘यरुशलेम नगरीमध्ये जे कोणी राहतील ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडतील. पण जे बाबिलोनचे सेनेला शरण जातील ते जगतील. त्यांचा जीव वाचेल; ते जगतील.’ आणि याहवेह असे म्हणतात: ‘हे शहर निश्चितच बाबिलोनचे राजाच्या सेनेच्या हाती देण्यात येईल, तो ते हस्तगत करेल.’ ” मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.” यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.” मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला. यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता. एबेद-मेलेख लागलीच राजवाड्याच्या बाहेर गेला व राजाला म्हणाला, “महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.” मग राजाने कूशी एबेद-मेलेखला सांगितले, “तू तीस माणसे घेऊन जा आणि यिर्मयाह संदेष्टा मरण्याआधीच त्याला त्या अंधार विहिरीतून बाहेर काढ.” तेव्हा इथिओपी एबेद-मेलेखने माणसे घेतली आणि तो राजवाड्यातील एका कोठारात गेला. तिथे टाकून दिलेल्या वस्तू व जुने कपडे ठेवलेले होते. तिथून काही चिंध्या व जुने कपडे घेऊन तो अंधार विहिरीकडे गेला व दोरीला बांधून ते बोचके त्याने खाली यिर्मयाहकडे विहिरीत सोडले. कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्‍या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला. एके दिवशी सिद्कीयाह राजाने निरोप पाठविला की यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहच्या मंदिराच्या बाजूच्या देवडीत घेऊन यावे. राजा यिर्मयाहला म्हणाला, “मी तुला काही विचारणार आहे. तर खरे तेच सांग. मजपासून काहीही लपविण्याचा प्रयत्न करू नकोस.” त्यावर यिर्मयाह सिद्कीयाह राजा म्हणाला, “मी तुम्हाला उत्तर दिले, तर तुम्ही मला ठार करणार नाही का? आणि मी तुम्हाला काही सल्ला जरी दिला तरी तुम्ही माझे ऐकणार नाहीच.” तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हाती तुला देणार नाही.” मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल. परंतु तुम्ही बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे नाकारलेस, तर हे शहर बाबेल्यांच्या हाती देण्यात येईल आणि ते या शहराला आग लावील आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाहीस.” यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.” यिर्मयाहने उत्तर दिले, “ते तुम्हाला त्यांच्या हवाली करणार नाही. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळा व मी काय सांगतो ते करा. तर ते तुम्हाला हितकारक ठरेल आणि तुमचा जीव वाचेल. मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे: तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’ “तुमच्या सर्व स्त्रिया व मुले यांना बाबिलोनच्या लोकांच्या हवाली केले जाईल, आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाही. बाबिलोनचा राजा तुम्हाला पकडेल आणि हे शहर जळून खाक होईल.” मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल. मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्‍यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली, तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ” सर्व नगराधिकारी यिर्मयाहकडे आले व त्याला प्रश्न विचारू लागले. तेव्हा राजाने आज्ञापिल्याप्रमाणे यिर्मयाहने त्यांना सांगितले. मग त्यांनी त्याला काहीही विचारले नाही व राजाशी त्याचा झालेला संवाद कोणीही ऐकला नव्हता. आणि बाबिलोनच्या लोकांनी यरुशलेम पुन्हा जिंकून घेईपर्यंत, यिर्मयाह राजवाड्यातील अंगणात राहिला.

सामायिक करा
यिर्मया 38 वाचा

यिर्मया 38:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग यिर्मयाने सर्व लोकांना जी वचने सांगितली ती शफाट्या बिन मत्तान, गदल्या बिन पशहूर, युकाल बिन शलेम्या व पशहूर बिन मल्कीया ह्यांनी ऐकली, ती ही : “परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल. परमेश्वर म्हणतो, हे नगर खातरीने बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती जाईल व तो ते घेईल.” मग सरदार राजाला म्हणाले, “ह्या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून ह्या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य ह्या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.” तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.” मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला. त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला कूशी खोजा एबद-मलेख ह्याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता. एबद-मलेख राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला, “स्वामीराज, ह्या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जे सर्व केले ते फार वाईट केले; त्यांनी त्याला विहिरीत टाकले; तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल, कारण नगरात काही अन्न उरले नाही.” तेव्हा राजाने एबद-मलेख कूशी ह्याला आज्ञा केली की, “येथून तीस1 माणसे बरोबर घेऊन जा आणि यिर्मया संदेष्ट्याला मृत्यू प्राप्त झाला नाही तोच त्याला विहिरीतून बाहेर काढ.” एबद-मलेख बरोबर माणसे घेऊन खजिन्याच्या राजगृहात गेला; तेथून त्याने जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या घेतल्या, आणि दोरांनी त्या विहिरीत यिर्मयाकडे पोहचवल्या. एबद-मलेख कूशी यिर्मयाला म्हणाला, “ही जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या दोरांच्या आत ठेवून आपल्या बगलांखाली लाव.” यिर्मयाने तसे केले. तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले. मग यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला. नंतर सिद्कीया राजाने यिर्मया संदेष्ट्याला बोलावणे पाठवून परमेश्वराच्या मंदिराच्या तिसर्‍या द्वाराच्या देवडीत आणवले. राजा यिर्मयाला म्हणाला, “मी तुला एक गोष्ट विचारतो; माझ्यापासून काही लपवू नकोस.” यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “मी आपणांला ती सांगितली तर आपण मला खरोखर मारून टाकणार नाही ना? मी आपणांला मसलत दिली तर आपण ती ऐकणार नाही.” सिद्कीयाने गुप्तपणे यिर्मयाला प्रतिज्ञापूर्वक म्हटले, “आमचा जीव ज्याने उत्पन्न केला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुला जिवे मारणार नाही व तुझा प्राण घेऊ पाहणार्‍या ह्या लोकांच्या हाती तुला देणार नाही.” मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे गेलास तर तुझा जीव वाचेल व हे नगर अग्नीने जाळण्यात येणार नाही; तू व तुझे घराणे वाचेल; पण तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे न गेलास तर हे नगर खास्दी लोकांच्या हाती देण्यात येईल, ते नगर ते अग्नीने जाळतील व तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस.” सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.” यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला विनवतो की, मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी आहे असे समजून ती पाळ, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल. पण तू निघून जाण्यास नाकबूल असलास तर परमेश्वराने मला प्रकट केलेले वचन हे आहे : पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’ तुझी सर्व बायकापोरे खास्द्यांकडे नेतील; तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस, बाबेलच्या राजाच्या हाती पडशील; तू हे नगर अग्नीने जाळण्यास कारण होशील.” सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “ही वचने कोणाला कळू देऊ नकोस, म्हणजे तू ठार व्हायचा नाहीस; पण मी तुझ्याबरोबर बोललो असे ऐकून सरदार तुझ्याकडे आले व तुला म्हणाले की, ‘तू राजाशी काय बोललास ते आम्हांला सांग; आमच्यापासून काही लपवू नकोस, आम्ही तुला ठार मारणार नाही; राजा तुला काय बोलला तेही सांग;’ तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’ मग त्या सर्व सरदारांनी यिर्मयाकडे येऊन विचारले, तेव्हा राजाने त्याला जे शब्द बोलण्याची आज्ञा केली होती त्या सर्व शब्दांनी त्याने त्यांना उत्तर दिले. ते त्याच्याबरोबर आणखी काही बोलले नाहीत; कारण त्यांना ही गोष्ट समजली नाही. ह्याप्रमाणे यरुशलेम हस्तगत होईपर्यंत यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.

सामायिक करा
यिर्मया 38 वाचा