यिर्मया 36:20-26
यिर्मया 36:20-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली. राजाने यहूदीला ती गुंडाळी आणण्यासाठी पाठविले. यहूदीने अलीशामा चिटणीसाच्या खोलीतून गुंडाळी घेतली. नंतर यहूदीने तो राजाला व त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्याने वाचून दाखविला. आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती. तेव्हा असे झाले की, यहूदीने तीन चार पाने वाचल्यावर राजाने चाकूने ते कापले आणि ती सर्व गुंडाळी शेगडीतल्या विस्तवात नष्ट होऊन जाईपर्यंत त्याने त्यामध्ये फेकून दिली. परंतु राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकले तरी ते घाबरले नाहीत, त्यांनी आपले वस्त्रेही फाडली नाहीत. राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.
यिर्मया 36:20-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर अधिकार्यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले. हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता. यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले. राजा व त्याच्या इतर सर्व सेवेकऱ्यांनी हे ऐकल्यानंतर भय वाटल्याचे दर्शविले नाही वा संतापाने आपले वस्त्र फाडले नाही. त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही. याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.
यिर्मया 36:20-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ते चौकात राजाकडे गेले; तो पट त्यांनी अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यात ठेवला होता; त्यांनी ती सर्व वचने राजाच्या कानी पाडली. तेव्हा राजाने तो पट आणण्यास यहूदी ह्याला पाठवले; त्याने तो अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यातून आणला. तो यहूदीने राजाला व राजाभोवती उभे राहणार्या सर्व सरदारांना वाचून दाखवला. हा नववा महिना असून राजा हेमंतगृहात बसलेला होता व त्याच्यापुढे शेगडी पेटलेली होती. तेव्हा असे झाले की यहूदीने तीनचार पाने वाचून दाखवताच राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकला; येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला. राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली, तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत. राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्या ह्यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.