यिर्मया 25:1-14
यिर्मया 25:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाकडे आलेले वचन, ते असे, यहूदाचा राजा योशीया, याचा मुलगा, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या पाहिल्या वर्षात, यहूदा लोकांस आणि यरूशलेमधील राहणाऱ्यांना यिर्मया संदेष्ट्याने पुढील संराष्ट्र घोषीत केला: यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून तर गेली तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन माझ्याकडे येत आले आहे, मी तेव्हापासून आजपर्यंत तुम्हास ते ऐकवित आलो. पण तुम्ही ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठवले, ते बाहेर जाण्यासाठी उत्सुक होते, पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. ते संदेष्टे म्हणाले, “प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, आणि जे राष्ट्र परमेश्वराने तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना कायमचा राहण्यास दिला, त्यामध्ये जा. म्हणून दुसऱ्या दैवतांना अनुसरायला आणि त्यांना पाया पडायला त्यांच्या मागे जाऊ नका आणि तुम्ही त्यास आपल्या हातांच्या कामाने मला राग आणू नका, म्हणजे मी तुमचे काही वाईट करणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही माझे ऐकले नाहीत, आणि तुम्हावर अरिष्ट यावे म्हणून तुम्ही आपल्या हातांच्या कामाने मला राग आणून दिला.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन. त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल असे मी करीन. आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील. परमेश्वर असे म्हणतो, आणि असे होईल सत्तर वर्षे संपल्यावर, मी बाबेलाच्या राजाला आणि त्या राष्ट्राला आणि खास्द्यांच्या देशाला त्यांच्या दुष्कृत्यांमुळे शिक्षा करीन.” त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन. आणि त्या देशाविरूद्ध जी काही वचने मी बोललो, म्हणजे जे काही या पुस्तकात लिहीले आहे, जे सगळ्या राष्ट्रांविषयी यिर्मयाने भविष्य सांगितले ते मी त्यांच्यावर आणीन. त्यांना राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.
यिर्मया 25:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदीयाच्या सर्व लोकांबद्दल यिर्मयाहला संदेश मिळाला. मग यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाच्या सर्व लोकांना व यरुशलेमच्या रहिवाशांना म्हणाला: गेली तेवीस वर्षे—यहूदीयाचा राजा आमोनचा पुत्र योशीयाह याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षापासून आजपर्यंत—याहवेह मला त्यांचे संदेश देत आले आहेत आणि मी तेच संदेश परत परत तुम्हाला सांगत आलो आहे, पण तुम्ही ते ऐकले नाहीत. पुनः पुनः याहवेहने आपले सर्व सेवक संदेष्टे तुमच्याकडे पाठविले, पण तुम्ही ऐकावयाचे नाकारले व त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी तुम्हाला संदेश दिला: “तुम्ही प्रत्येकजण तुमच्या दुष्ट मार्गापासून व जी दुष्कर्मे करीत आहात त्यापासून मागे फिरा, तरच याहवेहने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्वकाळासाठी दिलेल्या या देशात तुम्ही राहाल. इतर दैवतांची सेवा करण्यासाठी त्यांचे अनुसरण करू नका व त्यांची उपासना करू नका; तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकवू नका. तर मी तुम्हाला अपाय करणार नाही.” याहवेह म्हणतात, “पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकविला व सर्व संकटे तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली.” म्हणून आता सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तुम्ही माझी वचने ऐकली नाही, मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात, “त्यांचे हर्ष व त्यांच्या आनंदोत्सवाचे स्वर, वर आणि वधूंचे स्वर, त्यांच्या जात्यांचे आवाज व त्यांच्या दिव्यांचा प्रकाश मी नाहीसा करेन. हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील. “गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन, या पुस्तकात मी जाहीर केलेले सर्व भयानक अनर्थ आणि यिर्मयाहने सर्व राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाणीत केलेल्या शिक्षा, मी या खाल्डियनांच्या देशावर आणेन. अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात.
यिर्मया 25:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे : यिर्मया संदेष्ट्याने यहूदाचे सर्व लोक व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना सांगितले की, “यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हांला सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो; तरी तुम्ही ते ऐकले नाही. परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आला, मोठ्या निकडीने पाठवत आला, तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लावला नाही. ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल; अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजनपूजन करण्यास त्यांच्यामागे जाऊ नका, म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही.’ तरी आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणून आपले नुकसान करून घ्यावे म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत. म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन. त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन. हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील. तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो. मी त्या देशाविषयी जी वचने बोललो आहे, आणि सर्व राष्ट्रांविषयी यिर्मयाने ह्या संदेशग्रंथात जे लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे सर्वकाही त्या देशावर आणीन. त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.