YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 13:1-27

यिर्मया 13:1-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.” तेव्हा मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे नेसावयास विकत घेतले व ते माझ्या कमरेस बांधले. नंतर परमेश्वराकडून मला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झाले ते असे, “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.” त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते लपवून ठेवले. पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.” त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला. तेव्हा परमेश्वराचे वचन मजकडे पुन्हा आले व म्हणाले. परमेश्वर असे म्हणतो, “याचप्रकारे मी यहूदाचा आणि यरूशलेमेचा अहंकारी नष्ट करीन. हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही. कारण जसा कमरबंध मनुष्याच्या कमरेभोवती लपेटलेला असतो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे, ते लोक माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी त्यांना आपणास लपेटलेले आहे. पण ते माझे ऐकावयाचे नाही.” परमेश्वर असे म्हणतो. “यास्तव तू हे वचन त्याना बोललेच पाहिजे, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल.’ तेव्हा ते तुला म्हणतील प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल हे आम्हांला माहीत नाही काय? मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, पाहा! या देशात राहणारे, दावीदाच्या सिंहासनावर बसलेले राजे, याजक, संदेष्टे आणि यरूशलेममध्ये सर्व राहणारे यांना मी मद्याच्या धुंदीने भरीन. मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो. ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे. त्याने अंधकार पसरविण्याच्या आधी, आणि अंधकारमय पर्वतावर तो तुमचे पाय डळमळण्याचे कारण बनण्याआधी, आणि तुम्ही प्रकाशाची प्रतीक्षा करतांना तो त्याची मृत्यूछाया करील व त्याचा निबीड अंधार करून ठेवील त्याच्या आधी, परमेश्वर, तुमचा देव याला मान द्या. म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारामुळे शोकाकुल होईन. माझे डोळे खात्रीने अश्रू गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे. राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे. नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तिच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत. आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे? ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय? तेव्हा तू कदाचित् स्वत:च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच या गोष्टी का घडतात?” हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे. कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय. यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील. हेच तुला माझ्याकडून देण्यात आले आहे, तुझा घोषीत केलेला वाटा, कारण तू मला विसरली आहे आणि खोट्यावर विश्वास ठेवला आहे, असे परमेश्वर म्हणतो. यरूशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल. तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोंगरावर मी पाहिली आहेत, हे यरूशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?

सामायिक करा
यिर्मया 13 वाचा

यिर्मया 13:1-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला. नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला: “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.” मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला. बर्‍याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.” मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता. तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे. हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी! याहवेह म्हणतात, ‘मनुष्याचा कमरबंद त्याच्या कमरेला वेढा घातलेला असतो, त्याचप्रमाणे यहूदीयाच्या सर्व लोकांना व इस्राएलच्या सर्व लोकांना मी वेढा घातला आहे, जेणेकरून त्यांनी माझ्या गौरवाचे व प्रशंसेचे व मानाचे लोक व्हावे. पण त्यांनी ऐकले नाही.’ “त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’ मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे. ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ” ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे. तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी, अंधारलेल्या डोंगरावर तुमची पावले अडखळण्याआधी, तुम्ही प्रकाशाची आशा कराल, पण ते त्यास गहन अंधकारात आणि निबिड काळोखात बदलतील. जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल. राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.” यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील, आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल. संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल पूर्णपणे नेण्यात येईल. नेत्र उंच करा व पाहा उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्‍यांना पाहा. ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे? ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का? “हे सर्व माझ्यावर का ओढवले?” असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे तुझी वस्त्रे फाडण्यात आली तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे. कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का? त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे. “वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी. हाच तुझा वाटा आहे, तुला माझ्याकडून मिळावयाचा वतनभाग हाच होय,” असे याहवेह जाहीर करतात, “कारण तू मला विसरला आहेस आणि खोट्या दैवतांवर विश्वास ठेवलास. म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल— तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”

सामायिक करा
यिर्मया 13 वाचा

यिर्मया 13:1-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराने मला सांगितले, “तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कंबरेस गुंडाळ पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कंबरेस गुंडाळला. मग परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा मला प्राप्त झाले की, “तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.” मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला. बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, “ऊठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.” तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तर तो कमरबंद खराब, कुचकामाचा झाला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले : “परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहूदाचा दिमाख, यरुशलेमेचा मोठा दिमाख नष्ट करीन. ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल. इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव त्यांना हे वचन सांग : ‘परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे;”’ ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक सुरई द्राक्षारसाने भरलेली आहे हे आम्हांला ठाऊक नाही काय?’ तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन. त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’ तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे. परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना. पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील. राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.” दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे. “उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे? ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय? ‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत. कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल. ह्यास्तव रानातल्या वार्‍यापुढे भूस उडते तसे मी त्यांना उडवीन. परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा, माझ्याकडून तुला मापून दिलेला वतनभाग आहे; कारण तू मला विसरलीस व खोट्यावर भरवसा ठेवलास. म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन म्हणजे तुझी लज्जा दिसेल. तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”

सामायिक करा
यिर्मया 13 वाचा