शास्ते 16:1-31
शास्ते 16:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शमशोन पलिष्टी प्रदेशाच्या गज्जा शहरास गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला. गज्जेकरास सांगण्यात आले की, “शमशोन तिथे आला आहे.” गज्जकरांना ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्यास जिवे मारू. शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले. त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते. पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही “त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकराशे चांदीची नाणी देऊ.” आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, “मी विनंती करते तुझे महान बळ कशात आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तीहीन होशील, ते मला सांग.” तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, “धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.” नंतर पलिष्ट्यांचे अधिकारी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्यास त्यांनी बांधले. तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत!” परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्या तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही. दलीला, शमशोनाला म्हणाली, “पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.” तेव्हा त्याने तिला सांगितले, “जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.” तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्यास बांधले, आणि त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत.” तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले. दलीला शमशोनाला म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाड्याच करत आला आहात. तुमच्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांगा.” तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू “माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर मनुष्यासारखा होईन.” तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्यास म्हणाली, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत!” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला. ती त्यास म्हणाली, “तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.” तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की, त्यास मरून जावेसे वाटू लागले. म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला, “माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन.” जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, “पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले. मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले. ती म्हणाली, “हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते, हे त्यास कळले नाही. पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे. तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याच्यासाठी मोठा यज्ञ अर्पण करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, “आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.” तेव्हा लोकांनी त्यास पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, “आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्याच्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यातल्या पुष्कळांना मारले, त्यास आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.” आणि ते जेव्हा आनंद साजरा करत होते तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरातून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्यास खांबांच्या मध्ये उभे केले होते. शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, “ज्या खांबांचा ह्या इमारतीला आधार आहे, ते मी चाचपावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्याच्यावर टेकेन.” ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, “हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपा करून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळ्यांविषयी पलिष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.” नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्यास आधार होता, त्यांच्यातला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला. तेव्हा शमशोन म्हणाला, “पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो!” मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते. नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले, आणि त्यास नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
शास्ते 16:1-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी शमशोन गाझा येथे गेला, जिथे त्याने एका वेश्येला पाहिले. तिच्यासोबत रात्र घालविण्यास तो आत गेला. गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.” परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली. काही काळानंतर सोरेक खोर्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे गेले व म्हणाले, “काहीतरी युक्ती कर आणि त्याच्या बळाचे रहस्य काय आहे आणि त्याच्यावर प्रबल होऊन, त्याला बांधून आपल्याला वश कसे करावे हे विचार. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची अकराशे शेकेल देऊ.” दलीला शमशोनास म्हणाली, “मला सांगा, तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य काय आहे आणि तुम्हाला कशाने बांधावे आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल.” शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्यांनी बांधले, तर मी दुसर्या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.” तेव्हा पलिष्टी अधिकार्यांनी तिला धनुष्याच्या न सुकलेल्या सात ताज्या दोर्या आणून दिल्या आणि तिने त्याला बांधून टाकले. काही लोक खोलीत लपून होते, तिने त्याला म्हटले, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत!” परंतु अग्नीजवळ जाताच सुताचा धागा जसा सहज तुटून जातो त्याप्रमाणे शमशोनाने त्या धनुष्याच्या दोर्या तोडून टाकल्या जणू आणि त्याच्या बळाचे रहस्य उघडकीस आले नाही. त्यानंतर दलीला शमशोनास म्हणाली, “तुम्ही मला मूर्ख बनविले आहे; तुम्ही मला खोटे सांगितले. तर आता, मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.” तो म्हणाला, “ज्यांचा कधीही वापर केला नाही अशा अगदी नव्या कोर्या दोरांनी जर मला कोणी बांधून टाकले, तर मी इतर मनुष्यासारखा बलहीन होईन.” तेव्हा दलीलाने नवीन दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधून टाकले. नंतर लोक खोलीत लपून बसलेले होते, ती त्याला म्हणाली, “शमशोन पलिष्टी लोक तुमच्यावर चालून आले आहेत!” परंतु शमशोनाने दंडाला बांधलेले दोर, सुताचा धागा तोडावा त्याप्रमाणे तोडून टाकले! तेव्हा दलीलाने शमशोनास म्हटले, “आतापर्यंत तुम्ही मला मूर्ख बनविले आणि आणि मला खोटे सांगितले. मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.” तो तिला म्हणाला, “पाहा, माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या आणि त्या फणीने घट्ट केल्या तर मी इतर माणसांसारखा बलहीन होईन.” मग तो झोपला असताना, दलीलाने त्याच्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या आणि ते फणीने घट्ट केल्या. परत ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला व त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला. नंतर ती त्याला म्हणाली, “जेव्हा तुमचे हृदय माझ्यावर नाही, तेव्हा तुम्हाला कसे म्हणता येईल, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो?’ ही तिसरी वेळ आहे जेव्हा तुम्ही मला मूर्ख बनविले आहे आणि तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य सांगितले नाही.” दररोज बोलून बोलून तिने त्याला भांडावून सोडले; त्याला जीव नकोसा झाला. म्हणून त्याने तिला सर्वकाही सांगितले, “माझ्या डोक्यावर कधीही वस्तरा वापरला नाही,” तो म्हणाला, “कारण मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून मी परमेश्वराला समर्पित एक नाजीर आहे. जर माझे केस कापले गेले, तर माझी शक्ती मला सोडून जाईल आणि मी दुसर्या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन बनेन.” जेव्हा दलीलाने पाहिले की त्याने तिला सर्वकाही सांगितले आहे, तेव्हा तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांना निरोप पाठविला, “एकदा अजून या; त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांच्या हातात चांदी घेऊन परत आले. त्याला आपल्या मांडीवर झोपविल्यानंतर, तिने कोणाला तरी बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करून घेतले आणि तिने त्याला वश करण्यास प्रारंभ केला आणि त्याचे सामर्थ्य त्याला सोडून गेले. मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही. तेव्हा पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर ते त्याला खाली गाझा येथे घेऊन गेले. त्याला कास्याच्या साखळ्यांनी जखडून कारागृहात त्याला धान्य दळावयाला लावले. परंतु त्याच्या डोक्यावरील केस मुंडण झाल्यानंतर पुन्हा वाढू लागले. आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोन याला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.” जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले, “आमच्या दैवताने आमच्या शत्रूला आमच्या हाती दिले आहे, जो आमच्या देशाची गांजणूक करणारा व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.” जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले, तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.” आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते. मग शमशोनाने याहवेहला प्रार्थना केली, अहो, सार्वभौम याहवेह माझी आठवण करा. परमेश्वरा कृपा करून आणखी एकदाच मला बळ द्या आणि म्हणजे या पलिष्ट्यांचा मी माझ्या डोळ्यांबद्दल त्याचा सूड घेऊ शकेन. मग ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेले होते, त्यास शमशोनाने एका बाजूला त्याच्या उजव्या हाताने, आणि दुसर्या बाजूला डाव्या हाताने धरले, शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले, आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोक यांच्यावर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती. नंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी त्याचे भाऊबंद आणि पित्याच्या घरचे सर्व कुटुंब खाली आले. त्यांनी त्याला परत आणले व सोराह आणि एष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा पिता मानोहाला मूठमाती दिली होती, तिथेच त्यालाही मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.
शास्ते 16:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली, आणि तो तिच्याकडे गेला. शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जा-करांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. ‘सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू’ असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले. इकडे शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला; नंतर उठून त्याने नगराच्या वेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारबाह्या ही अडसरांसकट उखडून खांद्यांवर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली. शमशोन आणि दलीला नंतर सोरेक खोर्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, “त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हांला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल, हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे. म्हणजे आम्हांला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची अकराशे नाणी देऊ.” दलीला शमशोनाला म्हणाली, “तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हांला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा.” शमशोनाने तिला उत्तर दिले, “धनुष्याच्या सात नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.” मग धनुष्याच्या सात नव्या वाद्या घेऊन पलिष्ट्यांचे सरदार तिच्याकडे आले आणि तिने त्याला त्या वाद्यांनी जखडून टाकले. त्या वेळी आतल्या खोलीत काही लोक तिने लपवून ठेवले होते. ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तेव्हा आगीची धग लागताच तागाचे सूत तटकन तुटावे तशा त्याने त्या वाद्या तोडून टाकल्या. अशा प्रकारे त्याच्या शक्तीचे मर्म कळले नाही. दलीला शमशोनाला म्हणाली, “तुम्ही लबाडी करून मला फसवले आहे; तुम्हांला कशाने बांधावे हे आता तरी मला सांगा!” तो तिला म्हणाला, “कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले, तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.” मग दलीलाने नवे दोर आणून त्याला बांधले व म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” त्या वेळी काही लोक आतल्या खोलीत दबा धरून बसले होते. तेव्हा धागा तोडावा तसे त्याने आपल्या दंडावरचे ते दोर तटातट तोडून टाकले. दलीला शमशोनाला म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला खोटे सांगून माझी फसवणूक केली आहे. कशाने तुम्हांला बांधता येईल ते मला सांगा.” तो तिला म्हणाला, “माझ्या केसांच्या सात बटा मागाच्या ताण्यात गुंफल्या तर ते होईल.” मग तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले व ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तेव्हा त्याने झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताणा उखडून टाकला. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, “तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर ’मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे कसे म्हणता? तुम्ही मला तीन वेळा फसवले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही.” तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला, म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, “माझ्या डोक्याला कधी वस्तरा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे; माझे मुंडण केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.” त्याने आपले सारे मनोगत सांगितल्याचे पाहून दलीलाने पलिष्ट्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की, “आणखी एकदाच या. कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले; आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती. पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले. पण त्याचे मुंडण झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. नंतर पलिष्ट्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रीत्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले; ते म्हणू लागले, “आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे.” त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करत म्हणाले, “आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणार्या आणि आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणार्या शत्रूला आपल्या हाती दिले आहे.” ते आनंदाच्या भरात म्हणाले, “शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले. आपला हात धरणार्या मुलाला शमशोन म्हणाला, “ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांवर टेकेन.” त्या इमारतीत स्त्रीपुरुषांची खूप गर्दी झाली होती. पलिष्ट्यांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे तीन हजार स्त्रीपुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.” ज्या मधल्या दोन खांबांवर ती इमारत आधारलेली होती त्यांतला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यांवर शमशोन टेकला. “पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो,” असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या सार्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व एष्टावोल ह्यांच्या दरम्यान त्याचा बाप मानोहा ह्याच्या कबरस्थानात त्यांनी त्याला मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला होता.