YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 3:1-18 - Compare All Versions

याकोब 3:1-18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्‍याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते! जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे; परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झर्‍याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्‍या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे. पण शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

सामायिक करा
याकोब 3 MARVBSI

याकोब 3:1-18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे. पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो. एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत. झर्‍याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजीरे देईल काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी. पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका. हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते. कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते. पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते. आणि शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

सामायिक करा
याकोब 3 IRVMAR

याकोब 3:1-18 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे. आपण सगळेच अनेकदा चुका करतो. मात्र कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याला आपण हवे तसे फिरवतो. किंवा तारू पाहा, ते एवढे मोठे असते व प्रचंड वाऱ्याने लोटले जात असते, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे तो अगदी लहानशा सुकाणूने ते फिरवतो. जिभेचे तसेच आहे:जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते! जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या सर्वांना मनुष्य वश करू शकतो व शकला आहे परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत! झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला ऑलिव्ह फळे किंवा द्राक्षवेलीला अंजीर येऊ शकत नाहीत; तसेच खाऱ्या पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी निघणे शक्य नाही. तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत. पण तुमच्या मनात कटु मत्सर व स्वार्थी महत्त्वकांक्षा आहे तर सुज्ञतेचा ताठा मिरवून सत्याविरुद्ध पाप करू नका. ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे. जेथे मत्सर व स्वार्थी वृत्ती आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक प्रकारचे कुकर्म आहे. परंतु वरून येणारी सुज्ञता ही मुळात शुद्ध असते. शिवाय ती शांतिप्रिय, सौम्य व स्नेहवर्धक असते; ती करुणायुक्त असून तिला सत्कृत्यांचे पीक येते; ती पक्षपात व ढोंगबाजी यांपासून अलिप्त असते आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते.

सामायिक करा
याकोब 3 MACLBSI

याकोब 3:1-18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

माझ्या विश्वासू बंधूंनो, तुम्हातील पुष्कळांनी शिक्षक होऊ नये, कारण तुम्हाला माहीत आहे की जे आपण शिक्षक आहोत त्या आपला न्याय अधिक कठोरपणे होईल. आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो. किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्‍यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात. त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे. जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे. सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे. परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे. या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो. याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये. एकाच झर्‍यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय? माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्‍या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही. तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे. परंतु तुम्ही कटुता, मत्सर आणि स्वार्थी इच्छा आपल्या अंतःकरणात बाळगत असाल, तर पोकळ बढाई मारू नका किंवा सत्य नाकारू नका. अशा प्रकारचे ज्ञान हे स्वर्गातून उतरत नाही, परंतु ते पृथ्वीवरील अनीतिमान व सैतानाकडून आहे. कारण जिथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असेल, तिथे अव्यवस्था व सर्व दुराचारी व्यवहार असतो. परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते. शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात.

सामायिक करा
याकोब 3 MRCV