यशया 65:1-25
यशया 65:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो. ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे! मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत, जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात. ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात. ते कबरींमध्ये बसून रात्रभर पहातात, आणि डुकराचे मांस खातात व त्यांच्या पात्रांत ओंगळ मासाचा रस्सा असतो. तरी ते असे म्हणतात, ‘दुर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे. या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते. “पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे, मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.” “त्यांची पापे आणि त्यांच्या वडिलांची पापे मी त्यांच्या पदरी भरून देईन.” परमेश्वर असे म्हणतो. “पर्वतांवर धूप जाळण्याबद्दल आणि टेकड्यांवर माझी थट्टा केल्या बद्दल मी त्यांना त्याची परत फेड करीन. मी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून देईन.” परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घडांत जेव्हा रस आढळतो, तेव्हा कोणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे.” मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही. मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील. मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील. “पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता. पण मी तुम्हास तलवारीसाठी नेमले आहे, आणि तुम्ही सर्व वधण्यासाठी वाकवले जाल, कारण मी जेव्हा बोलाविले, तुम्ही उत्तर दिले नाही, जेव्हा मी बोललो, तुम्ही ऐकले नाही; त्याऐवजी तुम्ही माझ्या नजरेत जे वाईट ते केले, आणि मला आवडत नसलेल्या गोष्टी करण्याची तुम्ही निवड केली.” तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही भुकेले रहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले रहाल.” माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल. माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल. तुम्ही तुमची नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप अशी ठेवून जाणार. मी, प्रभू परमेश्वर, तुम्हास ठार मारील. मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील. जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत:ला आशीर्वाद देईल. जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील. कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत. कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार, आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही. पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरूशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन. “मी यरूशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन.” तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही. तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ, किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल. शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल. “ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.” एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील. ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत. कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत. त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन. लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
यशया 65:1-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले; ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे. ज्या राष्ट्रांनी माझा धावा केला नाही त्यांना मी म्हटले, ‘पाहा मी इथे आहे, मी इथे आहे.’ ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत, हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात; जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात; जे डुकरांचे मांस खातात, आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो; जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’ असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत, एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो. “पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.” याहवेह असे म्हणतात: “कारण द्राक्षांच्या घोसात थोडाफार रस शिल्लक असतो आणि लोक म्हणतात, ‘यांचा नाश करू नका, त्यात अजूनही आशीर्वाद बाकी आहे,’ त्याप्रमाणे मी माझ्या सेवकांप्रीत्यर्थ करेन; मी त्या सर्वांचा नाश करणार नाही. मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, व तिथे माझे सेवक वसती करतील. माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल. “पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता, तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.” म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, पण तुम्ही उपाशी राहाल; माझ्या सेवकांना पेय मिळेल, पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. माझे सेवक हर्षोल्हास करतील, पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल. त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्या आनंदाने माझे सेवक गाणी गातील, पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल आणि भग्नहृदयी होऊन हृदयाच्या वेदनेने आकांत कराल. माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुमचे नाव शापवचन असे होईल; सार्वभौम याहवेह तुम्हाला ठार करतील, परंतु आपल्या सेवकांना नवीन नावाने संबोधतील. जो कोणी या भूमीवर आशीर्वादासाठी धावा करतो तो खऱ्या परमेश्वराद्वारेच करेल; जो कोणी या भूमीवर शपथ घेतो तो खऱ्या परमेश्वराचीच घेईल. कारण जुने त्रास विसरण्यात येतील, आणि माझ्या नजरेपासून लपविल्या जातील. “कारण पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही. परंतु मी जी निर्मिती करेन त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा. कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन. मी यरुशलेमसाठी आनंद करेन आणि माझे लोक मला आनंददायी होतील; यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी कधीही कानांवर पडणार नाही. “यापुढे तान्ही बाळे कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत. आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल; यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल; जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास तो शापित समजल्या जाईल. त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील. त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील, किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही, कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल, तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील; माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ सुखाने बहुतकाळ उपभोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत. कारण ते लोक आणि त्यांचे वंशज याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील. मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन. लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” असे याहवेह म्हणतात.
यशया 65:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“जे मला विचारत नसत त्यांना मी दर्शन दिले; माझा धावा करत नसत त्यांना मी प्राप्त झालो. ज्यांना माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी म्हणालो, ‘पाहा मी आहे, हा मी आहे.’ जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले; माझ्यासमक्ष बागांत यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत. ते कबरांमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढतात; डुकराचे मांस खातात, अमंगळ पदार्थांचा रस त्यांच्या पात्रांत असतो; ते म्हणतात, ‘हां! जवळ येऊ नकोस; तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे.’ ते माझ्या नाकात धुरासारखे, सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत. पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन; तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.” परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता ‘त्यात लाभ आहे म्हणून ह्याचा नाश करू नका’ असे लोक म्हणतात; त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन; मी अवघ्यांचा नाश करणार नाही. मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील. माझा धावा करणार्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. पण तुम्ही परमेश्वराला सोडले; जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करत नाही, गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करता, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेवता, त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.” ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल; पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदयी होऊन आकांत कराल. तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील; म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्य देवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील; देशातला जो शपथ वाहील तो ती सत्य देवाच्या नामाची वाहील; कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टिआड झाले आहेत. “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो. मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल. ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.