YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 51:1-8

यशया 51:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“जे तुम्ही न्यायाला अनुसरता, जे तुम्ही परमेश्वरास शोधता, ते तुम्ही माझे ऐका! ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले आहे, आणि ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हास खणून बाहेर काढले आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहावे. अब्राहामाकडे पाहा जो तुमचा पूर्वज आहे आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहा. कारण जेव्हा मी त्याला बोलावले तेव्हा तो एकटाच होता. मी त्यास बोलावले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले.” होय, परमेश्वर सियोनेचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. तो त्याचे रान एदेनाच्या बागेसारखे आणि त्याचे वाळवंट तो यार्देन नदीच्या जवळ, परमेश्वराच्या बागेसारखे केले आहे. आनंद व हर्ष, आभारप्रदर्शन आणि गायनाचा शब्द ही त्यामध्ये होतील. “माझ्या लोकांनो, माझ्या कडे लक्ष द्या, माझ्या लोकांनो माझ्या कडे आपला कान लावा, कारण नियम माझ्यापासूनच निघेल, आणि मी माझे न्यायीपण राष्ट्रांना प्रकाश असे करीन. मी न्यायीपण जवळ आले आहे, माझे तारण बाहेर निघाले आहे, आणि माझे बाहू राष्ट्रांचा न्यायनिवाडा करतील. द्वीपे माझी वाट पाहतील, आणि माझ्या बाहूंवर भरवसा ठेवतील. तू आपले डोळे वर आकाशाकडे लाव, आणि खाली पृथ्वीवर सभोवती पाहा. धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसे होतील, पृथ्वी वस्राप्रमाणे जीर्ण होईल, आणि तिच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील, परंतु माझे तारण अनंतकाल राहील, आणि माझी धार्मिकता तिचे काम करणे थांबवणार नाही. ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका! मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका. कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्याना खाईल, आणि किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल, पण माझा चांगुलपणा सर्वकाळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील.”

सामायिक करा
यशया 51 वाचा

यशया 51:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे व जे याहवेहचा शोध घेता, ते सर्वजण, माझे ऐका: ज्या खडकातून तुम्हाला कापून काढले, आणि ज्या खाणीतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे बघा; होय, तुमचा पिता अब्राहामाकडे, आणि साराहकडे, जिने तुम्हाला जन्म दिला, त्यांच्याकडे बघा. मी अब्राहामाला बोलाविले, तेव्हा तो एकटा होता, मी त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा तो बहुगुणित झाला. तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील. “माझ्या लोकांनो, माझे ऐका; माझ्या देशा, माझ्याकडे लक्ष दे: माझाकडूनच तुम्हाला उपदेश प्राप्त होईल. माझा न्याय राष्ट्रांसाठी प्रकाश बनेल. माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे, माझे तारण येण्याच्या मार्गावर आहे. माझी भुजा राष्ट्रांना न्याय प्रदान करेल. द्वीप माझा शोध घेतील आणि माझ्या भुजेची आशेने वाट पाहतील. तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा, आणि खाली पृथ्वीकडे पाहा; आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल, पृथ्वी वस्‍त्रांप्रमाणे जीर्ण होईल आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील. परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल. माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही. “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो, माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्‍यांनो माझे ऐका: मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका. कारण वस्त्रांसारखे कसर त्यांचाही नाश करेल; लोकरीसारखे कीड त्यांनाही खाऊन टाकेल. परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल. व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.”

सामायिक करा
यशया 51 वाचा

यशया 51:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका; ज्या खडकातून तुम्हांला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हांला खणून काढले त्याकडे लक्ष द्या. अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे. माझ्या लोकांनो, माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रजे, माझ्याकडे कान दे; कारण माझ्यापासून नियमशास्त्र निघेल व राष्ट्रांना प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या न्यायाची संस्थापना करीन. माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे. वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या; कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटांप्रमाणे मरतील; तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही. हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यांना कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यांना कीड खाऊन टाकील; माझा न्याय तर सर्वकाळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील.”

सामायिक करा
यशया 51 वाचा