यशया 45:1-25
यशया 45:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील. मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन. अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे. कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी, मी तुला नावाने हाक मारली आहे. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले. अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही. मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो. हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो. पृथ्वी ते शोषून घेवो, त्या तारणास अंकुर फुटोत आणि त्याचबरोबर धार्मिकता एकत्रित वाढो. मी परमेश्वराने त्या दोघांना निर्मिले आहे. जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो? जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो. इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे, येणाऱ्या गोष्टीविषयी मला कोण विचारणार, तुम्ही माझ्या मुलांविषयी प्रश्न कराल का? तुझ्या हातच्या कामाबद्दल काय करायचे ते मला सांग? मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली. मी माझ्या हाताने आकाश पसरीले, आणि मी सर्व ताऱ्यांना दिसण्याची आज्ञा दिली. मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत, ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील. ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील, खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस. ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील. पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल; तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही. आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव, ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली. ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो, “मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही.” मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे. जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही. त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या. पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले? मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव व तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही. अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही. मी आपली शपथ वाहीली आहे, न्यायीपणाच्या माझ्या मुखातून वचन निघाले आहे, ते मागे फिरणार नाही आणि ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा वाकेल. प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ वाहील. माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील. इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील.
यशया 45:1-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, कोरेशने अनेक देश जिंकावे आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. मी त्याच्यासाठी दारे उघडेन; यापुढे या वेशी बंद होणार नाहीत: हे सायरसा, मी तुझ्यापुढे चालेन, मी पर्वत जमीनदोस्त करेन आणि कास्याच्या वेशी तोडेन व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन. दडवून ठेवलेली भांडारे, गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, इस्राएलचा परमेश्वर याहवेह मीच आहे हे तुला समजेल. माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला सामर्थ्य देईन. मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे. “अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या; मेघ त्याचा वर्षाव करोत, पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो, तारण उसळून वर येवो त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो; मी, याहवेहने हे निर्माण केले आहे. “जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो. जो जमिनीवर पडलेल्या अनेक मडक्याच्या तुकड्यांमधील केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे. माती कुंभाराला म्हणते काय, ‘हे तू काय घडवित आहेस?’ तुझी हस्तकृती तुला म्हणते काय, ‘कुंभाराला तर हातच नाहीत’? धिक्कार असो त्या मुलाला, जो त्याच्या पित्याला म्हणतो ‘तुम्ही कोणाला जन्म दिलात?’ किंवा त्याच्या आईला विचारतो, ‘तू कोणाला जन्मास घातले?’ “इस्राएलचे पवित्र परमेश्वर आणि तिचे निर्माणकर्ता, याहवेह हे असे म्हणतात: जे पुढे घडणार आहे त्याविषयी, माझ्या लेकरांबद्धल तुम्ही मला प्रश्न विचारता काय, किंवा माझ्या हस्तकृतीसाठी मला आज्ञा देता काय? ज्याने पृथ्वी अस्तित्वात आणली व तिच्यावर मानवजात निर्माण केली, तो मीच आहे. माझ्या हातांनी मी अंतराळ पसरले त्यांच्या तारकागण माझ्याच आज्ञेत आहेत. माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच सायरसला उभारेन: त्याचे सर्व मार्ग मी सरळ करेन. तो माझे शहर पुनर्निर्मित करेल, माझे बंदिवान लोक मोकळे करेल, पण ते तो बक्षीस किंवा मोबदल्यासाठी करणार नाही, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.” याहवेह असे म्हणतात: “इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल व शबाईचे ते उंच लोक— ते तुमच्याकडे येतील ते सर्वकाही तुमचेच होईल. बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील. तुम्हाला नमन करतील व विनंती करून म्हणतील, ‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही; त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ” हे परमेश्वरा आणि इस्राएलाच्या तारणकर्त्या, खरोखर तुम्ही परमेश्वर आहात, जे स्वतःला अदृश्य ठेवतात. जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील; ते सर्वजण एकत्र अपमानित केले जातील. परंतु अनंतकाळच्या तारणाने याहवेह इस्राएलला सोडवतील; युगानुयुगापर्यंत ते कधीही लज्जित व अपमानित होणार नाहीत. याहवेह असे म्हणतात— ज्यांनी आकाशे निर्माण केली तेच परमेश्वर आहेत; ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली, ती प्रस्थापित केली; ती ओसाड व निर्जन घडविली नाही, परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली— ते म्हणतात: “मीच याहवेह आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही. मी गुप्तपणे, एखाद्या अंधार्या ठिकाणाहून बोललो नाही; मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही, ‘माझा व्यर्थच शोध घ्या.’ मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो; जे योग्य आहे तेच घोषित करतो. “हे देशातून पलायन करणाऱ्यांनो, एकत्र या, जमा होऊन एकत्र या; लाकडी मूर्ती घेऊन फिरणारे अज्ञानी लोक, ते अशा दैवतांची प्रार्थना करतात, जे त्यांची सोडवणूक करू शकत नाहीत. पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा— आपसात विचारविनिमय करा. पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले, अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले? तो मीच, याहवेह नव्हतो काय? कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही, न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही. “पृथ्वीच्या सर्व टोकांनो, माझ्याकडे वळा व उद्धार पावा; कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही. मी स्वतः शपथ वाहिली आहे, माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल. ते माझ्याबद्दल म्हणतील, ‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ” जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील. इस्राएलचे सर्व वंशज याहवेहमध्ये सुटका पावतील आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतील.
यशया 45:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो. “परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. हे आकाशा, वरून वृष्टी कर; आभाळ नीतिमत्तेचा पाऊस पाडो; पृथ्वी उकलो, तारण आणि नीतिमत्ता ही प्रफुल्लित होवोत; ती एकत्र उगवोत; मी परमेश्वर ह्याचा उत्पन्नकर्ता आहे. जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असो! तो मातीच्या खापर्यांपैकी एक आहे. ‘तू काय करतोस’ असे माती आपल्या घडणार्याला म्हणेल काय? ‘तुला हात नाहीत’ असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय? ‘तू काय जन्म देतोस?’ असे जो बापाला म्हणतो, आणि ‘तू काय प्रसवतेस?’ असे जो आईला म्हणतो त्याला धिक्कार असो!”’ इस्राएलाचा निर्माणकर्ता पवित्र प्रभू, परमेश्वर म्हणतो, होणार्या गोष्टींविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हातांचे कृत्य ही पाहा, असे मला कोण सांगणार? मीच पृथ्वी केली व तिच्यावर माणसे उत्पन्न केली, मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरले; मी आकाशसेनेस आज्ञा दिली. मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली; मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन; तो माझे नगर बांधील व काहीएक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो, “मिसराच्या श्रमाचे फळ, कूशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक तुझ्याजवळ येऊन तुझे होतील; ते तुझ्यामागून येतील; बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालतील. ते तुला विनंती करून म्हणतील की : ‘खरोखर तुझ्याजवळ देव आहे, दुसरा कोणी नाही, दुसरा कोणीच देव नाही.”’ हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचीत गूढ देव आहेस. ते सर्व लज्जित व फजीत झाले आहेत; एकंदरीने मूर्तिकारांची फजिती उडाली आहे. इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही. आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली; हा परमेश्वर म्हणतो, “मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे. मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही; ‘शून्य स्थळी मला शोधा,’ असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही; नीतिमत्ता सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे. “राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत. बोला, त्यांना समोर आणा; त्यांना आपापसांत विचार करू द्या; हे कोणी पूर्वीपासून कळवले? हे कोणी पुरातन काळापासून ऐकवले? मी परमेश्वरानेच नव्हे काय? माझ्यावेगळा देव नाही; माझ्यावाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही. पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. मी आपली शपथ वाहिली आहे; माझ्या न्याय्यत्वाच्या मुखातून वचन निघाले आहे, ते बदलणार नाही; ते हे की, ‘माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील, प्रत्येक जिव्हा माझ्या ठायी निष्ठेची शपथ वाहील.’ माझ्याविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठायीच न्याय्यत्व व सामर्थ्य आहे; त्याला प्रत्येक जण शरण येईल; त्याच्यावर संतापलेले सर्व लज्जित होतील. इस्राएलाचा वंश परमेश्वराच्या ठायी नीतिमान ठरेल व त्याचा अभिमान बाळगतील.”