यशया 43:11-28
यशया 43:11-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही. मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो. यादिवसापासून मीच तो आहे, आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल? परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन, खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल. मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे. परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो, जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात; ते पुन्हा कधीच उठत नाहीत; ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का? मी रानातून रस्ता तयार करीन आणि वाळवंटातून पाण्याचे प्रवाह वाहवीन. रानातले वनपशू कोल्हे व शहामृग मला मान देतील, कारण मी आपल्या निवडलेल्या लोकांस पिण्यासाठी रानात पाणी आणि वाळवंटात नद्या देईन, या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी. हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस. तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस; किंवा तुझ्या अर्पणाने माझा मान राखला नाहीस. मी तुझ्यावर अन्नार्पणांचा भार घातला नाही आणि तुला धूपार्पणाकरता त्रास दिला नाही. तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस. पण तू आपल्या पापांचा भार माझ्यावर घातला आहे. तू आपल्या वाईट कृत्यांनी मला श्रमविले आहे. मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही. जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड. तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरूद्ध अपराध केला आहे. म्हणून मी पवित्रस्थानाच्या अधिपतींना अशुद्ध करीन. मी याकोबाला बंदी असलेल्या विध्वंसाच्या हाती देईल आणि इस्राएलास शिवीगाळ करून अपमान करील.
यशया 43:11-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी, केवळ मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले— मीच केले, तुमच्यातील इतर कोणत्याही विदेशी दैवताने केले नाही.” याहवेह घोषित करतात, तुम्ही माझे साक्षीदार आहात की, “मीच परमेश्वर आहे. सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे. माझ्या हातातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. मी जेव्हा कार्य करतो, त्याला कोणीही उलट करू शकत नाही.” तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह असे म्हणतात— “तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन आणि सर्व बाबेलच्या लोकांना ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता, त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन. मी याहवेह, तुमचा पवित्र परमेश्वर आहे, इस्राएलचा निर्माणकर्ता व तुमचा राजा आहे.” याहवेह असे म्हणतात— ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला, महासागरामधून रस्ता तयार केला, ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले, तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या, कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले: “पण पूर्वीच्या गोष्टी विसरा; गतकाळाचा जास्त विचार करू नका. पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे! ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का? मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे ओसाड भूमीत झरे बनवित आहे. रानातील हिंस्र श्वापदे कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात, कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी, ओसाड भूमीत झरे बनवितो, ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील. “परंतु याकोबा, तू माझा धावा केला नाही, इस्राएला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःला थकविले नाही. होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत. अर्पणे करून तुम्ही माझा सन्मान केला नाही. मी तुम्हाला अन्नार्पणाचे ओझे दिले नाही धूप जाळण्याचा आग्रह करून थकविले नाही. तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही, किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही. उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले व तुमच्या अपराधांनी मला शिणविले. “मी, खरोखर केवळ माझ्याकरिताच मी तुमचे अपराध पुसेन आणि पुन्हा त्यांची आठवणही करणार नाही. भूतकाळाचे परीक्षण करा, चला, याबद्दल चर्चा करू या; तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा. तुमच्या पूर्वपित्याने पातके केली; ज्याला मी पाठविले, कि तुम्हाला माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्यास शिकवावे. म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली; मी याकोबाला विध्वंसाच्या हवाली केले व इस्राएलला तिरस्कारास्पद केले.
यशया 43:11-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजावले; तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता; म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे” असे परमेश्वर म्हणतो. “येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?” परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे; मी इस्राएलाचा उत्पन्नकर्ता, तुमचा राजा आहे.” जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करतो, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर ह्यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्यांच्याने उठवत नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो की : “पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार; मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला. तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही. तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस. मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही. मला स्मरण दे, आपण एकमेकांशी वाद करू; तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग. तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले, तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत. म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.