यशया 41:1-29
यशया 41:1-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ. पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले. तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात. ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे. द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात. प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर. तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.” परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना, मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन. पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित व फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील. जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत. जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील. कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन. हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे. पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील. तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील. खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही. मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन; मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील. मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील. मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील. मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे, परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे. परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा. त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे, पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा, म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू. म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील. भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल; काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ. पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे. “मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो, आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.” आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही. मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे. जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही, एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही. पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत, आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत.
यशया 41:1-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा! राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या! त्यांना पुढे येऊन बोलू द्या; न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या. “पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले, नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले? राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात आणि राजांना त्याच्या अधीन करतात. ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात, त्याच्या धनुष्याने वार्याने उडणारा भुसा करतात. तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता, आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो. पुरातन काळापासून पिढ्यांना कोणी पाचारण केले व हे घडवून आणले? मी, याहवेह—मी आदि आहे, मी अंत आहे—तो मीच आहे.” बेटांनी हे बघितले व ते भयभीत झाले; पृथ्वीचा दिगंतापासून थरकाप झाला. त्यांनी प्रवेश केला व ते पुढे आले; ते एकमेकास साहाय्य करू लागले व त्यांच्या सहकार्यास म्हणाले “धैर्यवान हो!” धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो, आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा, ऐरणीवर घण मारणार्यास उत्तेजन देतो. धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.” मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो. “परंतु हे इस्राएल, माझे सेवक, याकोब, माझे निवडलेले, कारण तुम्ही माझा मित्र अब्राहामाचे वंशज आहात, पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे, तिच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातून मी तुम्हाला बोलाविले आहे. मी म्हटले, ‘तुम्ही माझे सेवक आहात’; मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नाकारले नाही. भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन. “पाहा, जे तुमच्यावर चवताळले, ते निश्चितच लज्जित व अपमानित होतील; ज्यांनी तुम्हाला विरोध केला ते नाहीसे होऊन नाश पावतील. तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल, पण ते तुम्हाला सापडणार नाहीत. जे तुमच्याविरुद्ध युद्ध करतात त्यांचे अस्तित्वच राहणार नाही. कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा उजवा हात धरतो आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; मी तुला साहाय्य करेन. हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात, “पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल. तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल. “गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण पाणी कुठेही नाही; तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही. ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील. मी वाळवंटात देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन. गंधसरूची झाडे माळरानात लावेन, चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन. जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील, ते विचार करतील व त्यांना समजेल, याहवेहच्या बाहूंनी हे सर्व केले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरानेच हे निर्माण केले आहे. “तुमचा वाद पुढे आणा,” असे याहवेह म्हणतात. “तुमचा विवाद पुढे चालवा” असे याकोबाचा राजा म्हणतो. “हे मूर्तींनो, आम्हाला सांगा, भावी काळात काय घडणार आहे. आम्हाला सांगा, गतकाळात कोणत्या घटना घडल्या, म्हणजे आम्ही त्याबद्दल विचार करू आणि त्यांचा परिणाम आम्हाला कळेल. किंवा पुढे होणाऱ्या घटना तरी सांगा, भविष्यात काय घडणार ते सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही देव आहात. काही तरी करा, चांगले वा वाईट, म्हणजे आम्ही भयभीत होऊ व घाबरून जाऊ. परंतु तुम्ही शून्यते पेक्षाही कमी आहात आणि तुमची कामे पूर्णपणे व्यर्थ आहेत; जो कोणी तुमची निवड करतो, तो धिक्कार-योग्य आहे. “मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे— एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो. तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत, जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे. हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल, किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’ कोणीही हे सांगितले नाही, कोणीही हे भविष्य केले नाही, कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही. मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’ मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला. मी बघितले, पण तिथे कोणीही नव्हते— तुमच्या दैवतांपैकी कोणीही सल्ला दिला नाही, मी विचारले तेव्हा त्यांच्यातील कोणीही उत्तर दिले नाही. पाहा, ती सर्व खोटी आहेत! त्यांची कामे व्यर्थ आहेत; त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत.
यशया 41:1-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू. ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो. तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो. हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्यांनाही तो मीच आहे. द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली. त्यांतील प्रत्येकाने आपापल्या सोबत्याला साहाय्य केले, प्रत्येक आपल्या बंधूस म्हणाला, “हिंमत धर.” ओतार्याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्याने ऐरणीवर घण मारणार्याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली. माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”; तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझ्याशी लढणार्यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत; तुझ्याशी युद्ध करणार्यांचा नायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.” हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील. दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही. मी उजाड टेकड्यांवर नद्या व खोल दर्यांतून झरे वाहवीन; मी अरण्य पाण्याचे तळे व निर्जल प्रदेश झरे करीन. अरण्यात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी व कण्हेर ह्यांची लावणी करीन व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन. येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे. परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा. ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हांला कळवा; प्रथम घडणार्या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू; अथवा पुढे होणार्या गोष्टी आम्हांला ऐकवा. पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू; तुम्ही बरेवाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तत्काळ चकित होऊन1 त्याकडे पाहू. पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय. मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील. आम्हांला समजावे म्हणून हे प्रारंभापासून कोणी प्रकट केले? “तो न्यायी आहे” असे आम्ही म्हणावे म्हणून पूर्वकालापासून कोणी सांगितले? हे कोणीच कळवले नाही; कोणी हे ऐकवले नाही; कोणी तुमचे शब्द ऐकले नाहीत. मीच प्रथम सीयोनेस म्हणालो, “हे पाहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमला आहे.” मी पाहतो तर कोणी दिसेना; मी विचारतो तर त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही. पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.