यशया 18:1-5
यशया 18:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय; जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा, अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका. परमेश्वराने मला हे सांगितले आहे की, जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन. कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात, तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल.
यशया 18:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कूशच्या नद्यांच्या काठावर असलेल्या देशांचा, जिथून पंखांचा फडफड आवाज येतो त्यास धिक्कार असो. जो समुद्रमार्गाने पाण्यावरून पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल. याहवेह मला असे म्हणतात: “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.” कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.
यशया 18:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरे, कूशातील नद्यांपलीकडल्या फडफडणार्या पंखांच्या देशा! तो पाण्यावर चालणार्या लव्हाळ्यांच्या नावांतून जलमार्गाने वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच बांध्याच्या व तुळतुळीत अंगाच्या राष्ट्रांकडे जा; ते लोक मुळापासूनच भयंकर आहेत. ते हुकूमत चालवणारे व पादाक्रांत करणारे राष्ट्र आहे; त्याची भूमी नद्यांनी विभागलेली आहे. अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका. परमेश्वराने मला सांगितले की : “सूर्य प्रकाशत असता स्वच्छ ऊन पडते व कापणीच्या समयी उष्णकाळी दहिवरयुक्त अभ्र येते, तसा मी शांत राहून आपल्या निवासस्थानातून अवलोकन करीन.” कारण मोहर गळाल्यावर त्याच्या जागी द्राक्षे येऊन पिकायला लागतात, तेव्हा हंगामापूर्वी तो कोयत्यांनी डाहळ्या छाटील व पसरलेल्या फांद्या तोडून टाकील.