YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 14:3-14

यशया 14:3-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल, बाबेलाच्या राजा विरूद्धचे हे टोचणारे गाणे तू म्हणशील, “जाचणाऱ्याचा कसा नाश झाला आहे, गर्विष्ठाचा त्वेष संपला. दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे. जो क्रोधाने लोकांस निरंतर ठोसे मारत असे, तो रागाने राष्ट्रावर राज्य करीत असे, कोणाला आडकाठी घालता येईना असा हल्ला करत असे तो परमेश्वराने मोडला आहे. सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे. लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात; ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’ जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे. तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील, सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे. ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे. तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’ हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे! जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन, देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन. मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’

सामायिक करा
यशया 14 वाचा

यशया 14:3-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्या दिवशी याहवेह तुम्हाला तुमच्या सर्व पीडा व अस्वस्थता व कठोर परिश्रमातून मुक्तता देतील. तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल: पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे! त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे! कारण याहवेहने दुष्टांची काठी, व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे, ज्या लोकांना तू क्रोधाने मारले, सतत ठोसा मारत राहिलास, बेफाम त्वेषाने व पाषाणहृदयी आवेशाने देशांना अधीन केले. सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत; ते गाणी गात आहेत. लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, “आता तुम्हाला खाली पाडले आहे, तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.” अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी मृतांच्या रसातळात हालचाल होत आहे; मेलेल्यांचे आत्मे जागृत होऊन तुम्हाला अभिवादन करण्यासाठी— जगामध्ये जे सर्व पुढारी होते; जे सर्व राष्ट्रांवरील राजे होते, ते त्यांच्या सिंहासनावरून उठत आहेत. ते सर्व प्रतिसाद देतील, ते तुम्हाला असे म्हणतील, “जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात; तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.” तुमच्या वीणांच्या आवाजासहीत, तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे, कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत. पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस! तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, “मी स्वर्गात चढून जाईन; मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, झाफोनच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन. मी ढगांच्या शिखरांवर जाईन; मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.”

सामायिक करा
यशया 14 वाचा

यशया 14:3-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझ्यावर लादलेले कठीण दास्य ह्यांपासून परमेश्वर तुला आराम देईल, त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने हे कवन तू म्हणशील : “पिडणारा कसा नाहीसा झाला! पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे! जो क्रोधाने लोकांचे सतत ताडन करीत असे, जो कोपाने अनिवार छळ करून राष्ट्रांवर सत्ता चालवत असे, तो दुर्जनांचा सोटा, अधिपतींचा दंड, परमेश्वराने मोडून टाकला आहे. सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे; लोक गाण्याचा गजर करीत आहेत. सुरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझ्यामुळे हर्षित होऊन म्हणतात, ‘तू पडलास तेव्हापासून आमच्यावर कुर्‍हाड चालवणारा कोणी येत नाही.’ खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे; तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे; राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या-त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे. ते सर्व उठून तुला म्हणतात, ‘तूही आमच्याप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस काय?’ तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे; तुझ्याखाली कृमींचे अंथरूण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरूण झाले आहे. हे देदिप्यमान तार्‍या,1 प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्रांना लोळवणार्‍या तुला धुळीत कसे टाकले! जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन; मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन;’

सामायिक करा
यशया 14 वाचा