यशया 1:10-20
यशया 1:10-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या. परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;” जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले? पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही. तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत. स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा; चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा. परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील. जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.
यशया 1:10-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका! “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा? अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही. तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत! “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा. योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील. जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल; परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.
यशया 1:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या. “परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल; तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”