होशेय 2:1-23
होशेय 2:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“आपल्या भावांना म्हणा, अम्मी, आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’” तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तीचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो. जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन. तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही. त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात. म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे तिला वाट सापडणार नाही. ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती. कारण तिला हे ठाऊक नाही की, तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस, तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली, नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली. म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन. नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही. मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन. मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील. तिने बआलास धूप दिला, आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो. यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन, आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन. मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती. हे परमेश्वर घोषित करतो की, त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती म्हणशील, आणि पुन्हा मला बाली म्हणणार नाहीस. कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही. त्या दिवशी मी इस्राएलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य तलवार आणि लढाई नाहीशी करीन, व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील. मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन. मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईन. मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे. आणि त्या दिवशी, मी उत्तर देईन, असे परमेश्वर घोषीत करतो, मी आकाशाला उत्तर देईल आणि आकाश भूमीला उत्तर देईन. आणि भूमी धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील. मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन, आणि लो रुहामावर दया करीन. जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.
होशेय 2:1-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’ असे म्हणा. “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तिचा पती नाही. ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो. नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, निर्जल भूमीसारखी ठेवेन व तिला तहानेने जिवे मारीन. मी तिच्या मुलांच्या प्रती आपली प्रीती दाखविणार नाही, कारण ती मुले व्यभिचाराची आहेत. कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’ म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही. ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’ तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले. “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन. म्हणून मी आता तिची अश्लीलता तिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन; माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही. मी तिचे सर्व उत्सव: तिचे वार्षिक सण, तिचे नवीन चंद्रदर्शन, तिचे शब्बाथाचे दिवस—नेमून दिलेले तिचे सर्व सण बंद करेन. मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन, जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे; मी त्यांचे गर्द झाडी करेन व वनपशू ते खाऊन टाकतील. जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला, तिला मी त्या दिवसांसाठी शिक्षा करेन; तिने स्वतःला अंगठ्यांनी आणि दागिन्यांनी सजविले, आणि तिच्या प्रियकरांच्या मागे गेली, परंतु मला मात्र ती विसरून गेली,” असे याहवेह घोषित करतात. “म्हणून तिला मी भुलविणार; तिला रानात घेऊन जाईन आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन. तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन. जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात जसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल. “त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल; यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल’ असे म्हणणार नाही, याहवेह असे घोषित करतात. मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन; यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्यासाठी रानातील पशू, आकाशातील पक्षी आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. धनुष्य आणि तलवार आणि लढाया मी देशातून काढून टाकेन, म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल. मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन; मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय, प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन. विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन, आणि याहवेहची ओळख तुला होईल. “त्या दिवशी मी प्रतिसाद देईन; मी आकाशाला प्रतिसाद देईन आणि ते पृथ्वीला प्रतिसाद देतील;” याहवेह अशी घोषणा करतात. “आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल यांना प्रतिसाद देईल, आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील. मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”
होशेय 2:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या बंधूंना ‘अम्मी’ (माझे लोक), आपल्या भगिनींना ‘रुहामा’ (दया पावलेल्या) म्हणा. “तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो; नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन. तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जारकर्माची आहेत. त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’ ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन. ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’ तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही. म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन. आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही. तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन. ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील. बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस. कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही. त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन. मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन, नीतीने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल; पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे2 ऐकतील. मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”