YouVersion लोगो
सर्च आयकॉन

होशेय 14:1-9

होशेय 14:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू. अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते. ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल. त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल. एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते. कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.

सामायिक करा
होशेय 14 वाचा

होशेय 14:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे! परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू. अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.” “मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे. मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील; त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल. लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील; ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील, द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील— इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल. हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे? मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन. मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे; तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.” कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.

सामायिक करा
होशेय 14 वाचा

होशेय 14:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते. मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील; ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील; त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षारसासाखी होईल. एफ्राइमाला ह्यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन; मी हिरव्यागार सरूसारखा आहे; माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.

सामायिक करा
होशेय 14 वाचा