होशेय 11:1-8
होशेय 11:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले. त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत. तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो. मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले. ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात? त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील, त्यांचा नाश त्यांच्या स्वत:च्या योजनांमुळे होईल. माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही. हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
होशेय 11:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले. पण त्यांना जितके जास्त बोलाविले, तितके ते माझ्यापासून दूर गेले. त्यांनी बआलापुढे बळी दिले आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला. मी तोच होतो ज्याने एफ्राईमला चालण्यास शिकविले, मी त्यांना कडेवर वागवले; तो मीच होतो ज्याने त्यांना आरोग्य दिले, परंतु हे त्यांना समजले नाही. मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले. त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला गालापर्यंत उचलल्यासारखा होतो, आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे. “ते इजिप्त देशात परत जाणार नाहीत काय आणि अश्शूर त्यांच्यावर राज्य करणार नाही काय कारण ते पश्चात्ताप करण्यास नकार देतात? त्यांच्या शहरातून तलवार चमकेल; ती त्यांच्या खोट्या संदेष्ट्यांना मारून टाकेल व त्यांच्या योजनांचा अंत करेल. माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही. “अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; माझी सर्व करुणा जागृत झाली आहे.
होशेय 11:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले. जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत. मीच एफ्राइमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणार्यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले. ते मिसर देशात परत जाणार नाहीत, तर अश्शूर त्यांचा राजा होईल; कारण ते माझ्याकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत. त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील. माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत. हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.