YouVersion लोगो
सर्च आयकॉन

होशेय 1:2-11

होशेय 1:2-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.” म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. परमेश्वर होशेयला म्हणाला, त्याचे नाव इज्रेल ठेव, कारण काही वेळानंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा करणार आहे व इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे. त्या दिवशी मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन. गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही. तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन. मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग परमेश्वर म्हणाला, त्याचे नांव लो-अम्मी ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही. जरी इस्राएलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल जी मोजता येत नाही हे असे घडेल की, जिथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील. यहूदाचे लोक व इस्राएलचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.

सामायिक करा
होशेय 1 वाचा

होशेय 1:2-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.” म्हणून त्याने दिब्लाइमाची कन्या गोमेर हिच्याशी विवाह केला आणि ती गरोदर राहिली. तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन. त्या दिवशी येज्रीलच्या खोर्‍यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.” गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही. पण मी यहूदीयाच्या वंशावर मी प्रीती करेन; आणि मी त्यांना वाचवेन—धनुष्य, तलवार किंवा युद्ध, किंवा घोडे आणि घोडेस्वार यांच्याद्वारे नाही, परंतु मी याहवेह त्यांचा परमेश्वर, त्यांना वाचवेन.” लो-रुहामाचे दूध तोडल्यावर गोमेरने आणखी एका पुत्राला जन्म दिला. तेव्हा याहवेह म्हणाले, “याचे नाव लो-अम्मी असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाहीत आणि मी तुमचा परमेश्वर नाही. “तरीही इस्राएली लोक समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य असतील जी मापता येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असे. ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे म्हणतील तेव्हा यहूदाहचे संतान व इस्राएलचे संतान एकत्र येतील; ते एक पुढारी नेमतील आणि देशातून एकत्र बाहेर येतील, कारण तो येज्रीलचा किती महान दिवस असेल.

सामायिक करा
होशेय 1 वाचा

होशेय 1:2-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.” मग त्याने जाऊन दिब्लाइमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली; ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन. त्या दिवशी असे होईल की इज्रेल खोर्‍यात इस्राएलाच्या धनुष्याचा मी भंग करीन.” ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही. यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.” लो-रुहामेचे दूध तोडल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “ह्याचे नाव लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ठेव; कारण तुम्ही माझे लोक नव्हत व मी तुमचा नव्हे.” तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की, ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे जेथे त्यांना म्हणत, तेथे ‘तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,’ असे त्यांना म्हणतील. यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.

सामायिक करा
होशेय 1 वाचा