YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 8:1-13

इब्री 8:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे, तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे. प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते. जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर.” परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे. जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसऱ्या करार शोधण्याची गरज नव्हती. परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन. ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्यादिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,’ असे प्रभू म्हणतो. त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील. तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील. कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. या कराराला नवीन करार म्हणले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने व जीर्ण होत आहे, नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.

सामायिक करा
इब्री 8 वाचा

इब्री 8:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आमच्या म्हणण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे: आम्हाला असे एक महायाजक आहेत, जे स्वर्गामध्ये वैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे. प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत. आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे. जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात. जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.” परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत. जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती. परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. ते माझ्या कराराशी विश्वासू राहिले नाही, आणि मी त्यांच्यापासून दूर गेलो, असे प्रभू म्हणतात. परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील. कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील, मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.” त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल.

सामायिक करा
इब्री 8 वाचा

इब्री 8:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या ‘उजवीकडे बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर ‘प्रभूने घातलेल्या’ खर्‍या ‘मंडपाचा’ सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत. “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. लोकांना दोष लावून तो म्हणतो, “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत, आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला, आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला, शिकवणार नाही. कारण त्यांतील लहानांपासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील; कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.” त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.

सामायिक करा
इब्री 8 वाचा

इब्री 8:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवशाली सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला मिळाला आहे. तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने उभारलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता, तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत; ‘पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी बाळग’, ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता, तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे यहुदी लोकांचे याजकही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात. परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, तो अधिक चांगल्या अभिवचनाने स्थापन झालेला असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ याजकीय सेवाकार्य येशूला मिळाले आहे. तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा आवश्यक नसता. परंतु लोकांना दोष लावून परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील; तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे कोणीही आपल्या सहनागरिकाला सांगणार नाही आणि कुणालाही आपल्या बंधूला शिकवावे लागणार नाही; कारण त्यांतील लहानापासून थोरापर्यंत, सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच आठवणार नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते लवकरच नाहीसे होईल.

सामायिक करा
इब्री 8 वाचा