इब्री 7:1-28
इब्री 7:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला. व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे. यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला. आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा. मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्यास त्याने आशीर्वाद दिला. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते. एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे. एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात. कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता. लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांस नियमशास्त्र दिले गेले, पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता. कारण जेव्हा याजकपण बदलते तेव्हा नियमशास्त्रसुद्धा अवश्य बदलते. कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही. हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभू यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही. आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हाही गोष्ट आणखी स्पष्ट होते. मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने त्यास याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्यास याजक करण्यात आले. कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.” जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व निरुपयोगी होता. कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हास देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो. हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की, ‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही, तू युगानुयुगाचा याजक आहेस.’ याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे निरंतर ते याजकपद चालवू शकले नाही. त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो. म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे. म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे. जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.
इब्री 7:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा अब्राहामाने सर्वांचा दहावा भाग त्याला दिला. प्रथम मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ, “नीतिमत्वाचा राजा” असा आहे; आणि, “शालेमचा राजा” म्हणजे “शांतीचा राजा” असा आहे. त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो. तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला. लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो. परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो. या एका संदर्भात, याजक जे मर्त्य मानव आहेत, त्यांच्याद्वारे दशांश गोळा केल्या जातो, परंतु दुसर्या संदर्भात, तो जिवंत आहे असे त्याच्याविषयी जाहीर केले आहे. दशांश गोळा करणार्या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल. कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता. जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा? जेव्हा याजकपण बदलले, तेव्हा नियमात सुद्धा बदल होणे आवश्यक आहे. कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती. हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही. आणि जे काही आम्ही म्हटले ते अधिक स्पष्ट आहे की मलकीसदेकासारखा दुसरा याजक प्रकट होईल. ते पूर्वजांच्या नियमानुसार नव्हे, तर ज्या जीवनाचा अंत होऊ शकत नाही अशा जीवनापासून वाहणार्या सामर्थ्याच्या आधारावर याजक झाले; हे असे जाहीर करते: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.” पूर्वीचा नियम बाजूला ठेवण्यात आला, कारण तो कमकुवत व निरुपयोगी होता. (कारण नियमशास्त्राने काहीही परिपूर्ण केले नाही), आणि अधिक चांगल्या आशेची ओळख झाली आहे, ज्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो. आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले. परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ” कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत. आता असे पुष्कळ याजक होऊन गेले, जे मृत झाल्यामुळे त्यांची सेवा सातत्याने करू शकले नाहीत. पण येशू सदासर्वकाळ जिवंत आहेत; त्यांचे याजकपण युगानुयुगचे आहे. यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत. असे महायाजक खरोखर आपल्या गरजा भागविण्यास समर्थ आहेत—ते पवित्र, निर्दोष, शुद्ध, आणि पापी माणसांपासून वेगळे केलेले, स्वर्गाहून अधिक उंच केलेले आहेत. त्यांना त्या महायाजकांप्रमाणे प्रथम स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी दिवसेंदिवस यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्यांच्या पापासाठी एकदाच यज्ञ करून स्वतःला अर्पण केले. नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते.
इब्री 7:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’ व ‘अब्राहामाने’ त्याला ‘सर्व लुटीचा दशमांश’ दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे ‘शालेमाचा राजा’ म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची माता-पितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही, तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. लेवीच्या संतानांपैकी, ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. परंतु जो त्यांच्या वंशातला नव्हता त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे. इकडे पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर, जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे, त्याला मिळाले. आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता. ह्यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती तर ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या’ निराळ्या ‘याजकाचा’ उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या ‘संप्रदायाप्रमाणे’ म्हटलेले नसावे ह्याचे काय अगत्य राहिले असते? कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते. कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे; त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही. आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा ‘मलकीसदेकासारखा’ निराळा ‘याजक’ जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, “तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस.” पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही, (ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे] “‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,” असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला), त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. ते पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे; पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.
इब्री 7:1-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हा मलकीसदेक शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता; अब्राहाम जेव्हा राजांना पराभूत करून परत आला, तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला व अब्राहामने ह्याला सर्व लुटीचा दशमांश दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता; त्याचे मातापिता, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो शाश्वत याजक राहतो. तर आता कुलाधिपती अब्राहाम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. लेवीच्या संतानांपैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांकडून, म्हणजे अब्राहामच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांकडून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे; परंतु मलकीसदेक त्यांच्या वंशातला नव्हता. त्याने अब्राहामकडून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती, त्याला त्याने आशीर्वाद दिला. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो, हे निर्विवाद आहे. याजकांच्या बाजूने पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु मलकीसदेकच्या बाजूने पाहिले तर, अमर आहे असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे त्याला मिळाले; तसेच दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामच्याद्वारे दशमांश दिला, असे म्हणता येईल, कारण त्याचा पूर्वज अब्राहाम ह्याला मलकीसदेक भेटला त्या वेळेस लेवी अब्राहाममध्ये बीजरूपाने होता. लेवीय याजकपणाच्या आधारे इस्राएली लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले. जर ह्या याजकांची कृत्ये परिपूर्ण असती, तर अहरोनच्या संप्रदायाला सोडून मलकीसदेकच्या संप्रदायानुसार निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा ह्याची आवश्यकता उरली नसती. कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते. ज्याच्याविषयी हे सांगितले आहे, तो आपला प्रभू निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. कारण आपला प्रभू हा यहुदा वंशांतून उद्भवला हे सर्वपरिचित आहे आणि याजकांविषयी बोलताना मोशेने ह्या वंशाचा उल्लेख केला नाही. मानवी नियम निर्बंधांनी नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगे याजक असशील. पूर्वीचा नियम कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे रद्द झाला आहे, कारण मोशेच्या नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही आणि ज्या आशेद्वारे आपण देवाजवळ जातो, अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे; शिवाय येशूविषयी देवाची शपथ आहे. इतर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण येशूविषयी ‘तू युगानुयुगे याजक असशील’, अशी शपथ प्रभूने वाहिली आणि ती तो बदलणार नाही, असे सांगितले. त्याच्या त्या शपथेने येशू हा याजक झाला. ह्या फरकामुळे तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. दुसरा फरक म्हणजे इतर पुष्कळ याजक होऊन गेले; कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे; पण येशू युगानुयुगे राहणारा असल्यामुळे, ह्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच आपला प्रमुख याजक असणे योग्य होते; तो भक्तिमान, निर्दोष, शुद्ध व पापी जनांपासून वेगळा असताना आकाशांच्या पलीकडे त्याचा गौरव करण्यात आला. त्याला इतर प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी रोज यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केले, तेव्हा ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्र दुर्बल अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून दिलेले वचन युगानुयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राची नेमणूक करते.