उत्पत्ती 8:15-19
उत्पत्ती 8:15-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव नोहाला म्हणाला, “तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये. तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत.” तेव्हा नोहा, त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यांच्यासह तारवातून बाहेर आला; त्याच्या बरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव, आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले.
उत्पत्ती 8:15-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग परमेश्वराने नोआहला सांगितले, “तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे. प्रत्येक प्रकारचा सजीव प्राणी—पक्षी, पशू, सरपटणारे सर्व प्राणी—यांनाही बाहेर आणावे, म्हणजे त्यांची भरभराट होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.” मग नोआह, त्याचे पुत्र व त्याची पत्नी आणि पुत्रांच्या पत्नी हे तारूच्या बाहेर आले. यांच्याबरोबर पशू, सरपटणारे प्राणी व पक्षी—भूमीवर वावरणारे सर्वप्रकारचे प्राणी तारवातून उतरले.
उत्पत्ती 8:15-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग देव नोहाला म्हणाला, “तू आपली बायको, पुत्र व सुना ह्यांना घेऊन तारवातून बाहेर नीघ. पक्षी, पशू व भूमीवर रांगणारे सर्व ह्यांपैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.” तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना ह्यांना घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशू, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले.