उत्पत्ती 50:1-21
उत्पत्ती 50:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली. योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले. त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा, ‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन. फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.” तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले. आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते. तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली. ते यार्देन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळ्यावर आले, तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या पित्याकरिता सात दिवस शोक केला. कनान देशात राहणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचा हा फारच दुःखाचा प्रसंग आहे.” त्यामुळे आता त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव पडले आहे. अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या वडिलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला. याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, “तुझ्या वडिलाने मरण्यापूर्वी आम्हांला अशी आज्ञा दिली, तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका. मी काय देवाच्या स्थानी आहे काय? तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहत आहात. तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला.
उत्पत्ती 50:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योसेफ आपल्या पित्याल्या आलिंगन देऊन खूप रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. नंतर योसेफाने वैद्यास त्याचा पिता इस्राएल याच्या मृतदेहात मसाला भरण्याची आज्ञा दिली. मग वैद्यांनी मृतदेहात सुगंधी द्रव्याचा मसाला भरला. मसाला भरण्याच्या क्रियेला चाळीस दिवस लागले, मृतदेहात मसाला भरण्यास इतके दिवस लागत असत. इजिप्तच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली. “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.” फारोहने म्हटले, “तू वर जा आणि शपथ दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांना मूठमाती दे.” मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित— तसेच योसेफाचे पूर्ण कुटुंब म्हणजे त्याचे भाऊ आणि त्यांचे कुटुंब, या सर्वांसह गेला. परंतु त्यांनी त्यांची मुलेबाळे, गुरे, शेरडेमेंढरे गोशेन प्रांतातच मागे ठेवली. अशाप्रकारे योसेफाबरोबर रथ, घोडेस्वार गेले. तो मोठा समुदाय होता. जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला. जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.” इस्राएलने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी सर्वकाही केले: त्याचा मृतदेह कनान देशामध्ये आणला आणि अब्राहामाने एफ्रोन हिथी याच्यापासून मम्रेजवळील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत त्यांनी त्याला मूठमाती दिली. आपल्या वडिलांना मूठमाती दिल्यानंतर, योसेफ आपले भाऊ आणि आपल्या वडिलांच्या मूठमातीसाठी त्याच्याबरोबर गेलेले लोक यासह इजिप्त देशास परत आला. जेव्हा योसेफाच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील मरण पावले, ते म्हणाले, “आपण योसेफाला जी वाईट वागणूक दिली होती, त्याची जर त्याने वाईटाने आपल्याला परतफेड केली तर?” म्हणून त्यांनी योसेफाला निरोप पाठविला, “मरण्यापूर्वी तुझ्या वडिलांनी अशी सूचना दिली होती: ‘तुम्हाला हे योसेफाला बोलायचे आहे: आम्ही तुझ्याशी जे अतिदुष्टाईचे वर्तन केले त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागावी.’ त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पित्याच्या परमेश्वराचे सेवक तुझी क्षमा मागत आहोत.” जेव्हा हा संदेश योसेफाकडे आला, तेव्हा योसेफ रडला. नंतर त्याचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्याच्यापुढे पालथे पडून त्याला म्हणाले, “आम्ही तुझे गुलाम आहोत.” पण योसेफ त्यांना म्हणाला, “भीती बाळगू नका. मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे? तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत. म्हणून तुम्ही घाबरू नका; मी स्वतः तुमचा आणि तुमच्या मुलाबाळांचा पुरवठा करेन.” अशाप्रकारे त्यांच्याशी अतिशय ममतेने बोलून त्याने त्यांचे समाधान केले.
उत्पत्ती 50:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली; त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्राएलाच्या प्रेतात मसाला भरला. ह्या कामाला चाळीस दिवस लागले; प्रेतात मसाला भरायला इतके दिवस लागत असत; आणि मिसरी लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला. शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकांना म्हणाला, “तुमची कृपादृष्टी माझ्यावर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की, माझ्या बापाने माझ्याकडून आणभाक घेऊन म्हटले की, ‘पाहा, मी आता मरणार; तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदवून घेतली आहे तिच्यात मला नेऊन मूठमाती दे.’ मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरू द्यावे. मी परत येईन.” फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.” मग योसेफ आपल्या बापाला मूठमाती देण्यास निघून गेला, आणि फारोचे सर्व सेवक, त्याच्या घराण्यांतले वडील जन व मिसर देशातले सर्व वडील जन, योसेफाच्या घरचे सर्व लोक त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याच्याबरोबर गेले; आपली मुलेबाळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली. त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले; असा तो मोठा समुदाय निघाला. यार्देनेपलीकडे अटादाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा त्यांनी तेथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाने तेथे आपल्या बापासाठी फार आकांत करून सात दिवस शोक केला. देशातले रहिवासी कनानी ह्यांनी तो शोक पाहिला तेव्हा ते म्हणाले, ‘हा मिसरी लोकांचा भारी शोक आहे;’ त्यावरून त्या ठिकाणाचे नाव आबेल-मिस्राईम (मिसराचा शोक) पडले; ते यार्देनेपलीकडे आहे. इस्राएलाने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले; त्यांनी त्याला कनान देशात नेऊन मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत मूठमाती दिली; अब्राहामाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा. योसेफाने आपल्या बापाला मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्या-बरोबर गेले होते ते सर्व मिसर देशाला परत गेले. आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.” त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की, “आपल्या बापाने मरणापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी : तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.