YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 31:43-55

उत्पत्ती 31:43-55 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो? म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.” तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला. याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले. जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.” लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे. ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये. अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक, ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली. मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा

उत्पत्ती 31:43-55 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यावर लाबानाने याकोबास उत्तर दिले, “या स्त्रिया माझ्या मुली आहेत; ही मुलेबाळेही माझी आहेत; हे कळप व तुझे जे आहे ते सर्व माझेच आहे. तेव्हा माझ्या कन्या व त्यांची संतती यांचे मी आता करू? तर चल, आपण दोघे म्हणजे तू आणि मी शांतीचा करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष होवो.” तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला; आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले. मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद असे नाव दिले. लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात. यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.” तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.” लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे. हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे. अब्राहामाचे परमेश्वर आणि नाहोराचे परमेश्वर आणि त्याच्या पित्याचे परमेश्वर, आमच्यामध्ये न्याय करोत.” मग याकोबाने त्याचे वडील इसहाकाला ज्यांचे भय होते त्यांच्या नावाने शपथ घेतली. नंतर याकोबाने डोंगराच्या माथ्यावर परमेश्वराला एक अर्पण वाहिले. त्याने आपल्या सर्व नातलगांना मेजवानीस बोलाविले आणि त्यांनी भोजन करून ती सर्व रात्र त्या डोंगरावर घालविली. लाबान दुसर्‍या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा

उत्पत्ती 31:43-55 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यावर लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या मुली आहेत, आणि ही मुले माझी मुले आहेत; हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे; आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले ह्यांना मी काय करू? तर चल, तू आणि मी आपसात करार करू; आणि तो तुझ्यामाझ्यामध्ये साक्ष होवो.” तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला. मग याकोब आपल्या भाऊबंदांना म्हणाला, “धोंडे जमा करा,” आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली; आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या राशीस यगर-सहदूथा (अरेमाईक भाषेत साक्षीची रास) म्हटले व याकोबाने तिला गलेद (हीब्रू भाषेत साक्षीची रास) म्हटले. लाबान म्हणाला, “आता ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव ‘गलेद’ ठेवले.” तसेच ‘मिस्पा’ हेही नाव तिला दिले; तो म्हणाला, “कारण आपण परस्परांच्या दृष्टिआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा-माझा साक्षी असो. तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.” लाबान याकोबाला आणखी म्हणाला, “पाहा, तुझ्यामाझ्यामध्ये ही रास व हा स्तंभ मी उभा केला आहे. ही रास व हा स्तंभ साक्षी असो; अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझ्याकडे येणार नाही. तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्याकडे येऊ नयेस. अब्राहामाचा देव, नाहोराचा देव व त्यांच्या पित्याचे1 देव आपल्या दोघांचा न्याय करोत.” मग याकोबाने आपला बाप इसहाक ह्याचा जो ‘धाक’ त्याची शपथ वाहिली. नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली. लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा